राज्यात बलात्काराच्या घटना घटल्या - देवेंद्र फडणवीस
By Admin | Updated: July 19, 2016 16:54 IST2016-07-19T16:37:15+5:302016-07-19T16:54:59+5:30
सामूहिक बलात्कार आणि अल्पवयीन मुलींवरील बलात्कारांच्या घटनांमध्ये घट झाली आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.

राज्यात बलात्काराच्या घटना घटल्या - देवेंद्र फडणवीस
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - राज्यात सामूहिक बलात्कार आणि अल्पवयीन मुलींवरील बलात्कारांच्या घटनांमध्ये घट झाली आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत कोपर्डी बलात्कार घटनेवरील चर्चेला उत्तर देताना केला. अपहरण, बेपत्ता झालेल्या मुली, महिला आणि मुलांना शोधून पुन्हा घरी पाठवण्यामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
कोपर्डीची घटना घडल्यानंतर कोणीही वरिष्ठ अधिकारी तिथे गेला नाही हा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. कोपर्डीला गेलो नसलो तरी, या घटनेची संपूर्ण माहिती घेत होतो असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. कोपर्डीतील घटना अत्यंत दु:खद, दुर्देवी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर अमानुषतेने बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेवरुन आज विधानसभेतमध्ये विरोधकांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरेल. या विषयावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची विधानसभेत घोषणा केली.