आनंदच्या हस्ते राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद््घाटन

By Admin | Updated: January 6, 2016 03:53 IST2016-01-06T03:53:17+5:302016-01-06T03:53:17+5:30

नागपूरच्या बुद्धिबळ वर्तुळात मंगळवारची सुवर्ण अक्षरात नोंद झाली. ‘चौसष्ट घराचा राजा’ अशी ओळख असलेला....

Inauguration of National School Chess Championship at the hands of Anand | आनंदच्या हस्ते राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद््घाटन

आनंदच्या हस्ते राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद््घाटन

नागपूर : नागपूरच्या बुद्धिबळ वर्तुळात मंगळवारची सुवर्ण अक्षरात नोंद झाली. ‘चौसष्ट घराचा राजा’ अशी ओळख असलेला आणि पाचवेळा जगज्जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या विश्वनाथन आनंदच्या उपस्थितीने नागपूरचे बुद्धिबळ वर्तुळ पावन झाले. आनंदने राजापुढील प्यादे खेळून ‘एस.एस. इंटरनॅशनल’ पाचव्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे शैलीदार उद््घाटन केले. क ळमना मार्गावरील नैवेद्यम इस्टोरिया सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील बुद्धिबळपटूंचा आदर्श असलेल्या आनंदला याची देही याची डोळा बघण्यासाठी बुद्धिबळपटूंनी गर्दी केली होती.
उद््घाटन समारंभात बोलताना आनंदने गतस्मृतींना उजाळा दिला. ३० वर्षांपूर्वी सब-ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागपुरात आलो होतो, असे आनंद म्हणाला. बुद्धिबळ या खेळाचा विकास बघण्यासाठी नागपुरात पुन्हा येण्याची त्याने इच्छा जाहीर केली.
यावेळी नागपूरच्या बुद्धिबळ विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणारे नागपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्ही.के. त्रिवेदी यांचा आनंदच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विदर्भाचा पहिला ग्रॅण्डमास्टर स्वप्नील धोपाडे, महिला फिडे मास्टर दिव्या देशमुख, मृदुल डेहनकर आणि रौनक साधवाणी यांचा यावेळी आनंदच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आनंदने यावेळी सहभागी बुद्धिबळपटूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषी खात्याचे संचालक अतुल पाटणे, अतिरिक्त आयकर आयुक्त संजय दिवरे, नैवेद्यम समूहाचे राजू कामदार, आयोजन समिती सचिव दिलीप कामदार, एमसीएचे उपाध्यक्ष ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, आयोजन समितीचे अध्यक्ष मनोज इटकेलवार, एनडीसीएचे अध्यक्ष व्ही.के. त्रिवेदी, सचिव के.के. बारट, एमसीएचे कमिश्नर गिरीश चितळे, स्पर्धेचे मुख्य आॅर्बिटर रतिनाम अनंथराम, एस.एस. इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ समीर धुमे आणि संचालक सुरेश चिचघरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांसाठी बुद्धिबळ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद््घाटन आनंद यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आनंदने शाळेमध्ये बुद्धिबळ या खेळाच्या समावेशाचे महत्त्व विशद केले. ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांनी एमसीएसीआयएसतर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेसाठी बुद्धिबळ प्रशिक्षणाची योजना असल्याचे सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी).

Web Title: Inauguration of National School Chess Championship at the hands of Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.