महाराष्ट्रात मराठी हिंदीचा वाद सुरू असताना भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांबाबत वादग्रस्त विधान केले. मात्र, त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड यांनी मराठी माणसांचा अपमान केल्याबद्दल दुबेंना संसदेच्या लॉबीमध्ये घेरले. त्यानंतर आज पुन्हा वर्षा लोकसभेत वर्षा गायकवाड आणि निशिकांत दुबे यांच्यात जुंपली.
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत निशिकांत दुबे बोलत असताना वर्षा गायकवाड सतत बोलत होत्या. मात्र, यामुळे निशिकांत दुबे नाराज झाले. अशाप्रकारे समोरून रनिंग कॉमेंट्री चालू राहिली तर कामकाज कसे होणार, असा सवाल निशिकांत दुबे यांनी उपस्थित केला. पुढे निशिकांत दुबे यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले की, "या भगिनी पाहा, यांना इतकंही माहिती नाही की, संसदेच्या लॉबीमध्ये जे चालते ते हसत-मस्करीत सुरु असते. पण या त्याची बातमी करतात. अशाप्रकारे आम्हीही यांच्या भाषणात बोलू लागलो तर, काँग्रेसचे खासदार संसदेत एक शब्दही बोलू शकणार नाहीत."
दुबे यांच्या विधानानंतर वर्षा गायकवाड सभागृहात आक्रमक झाल्या आणि त्यांनी पुन्हा एकदा दुबे यांना प्रश्नांनी घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाला. "दुबे यांनी महाराष्ट्राचा अपमान केला, त्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारला," असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. यावेळी पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनीही वर्षा गायकवाड यांना शांत व्हायला सांगितले. "आपण बसल्या जागेवरून टिप्पणी करू नका. मी आपल्याला मध्ये बोलण्याची परवानगी दिलेली नाही. कृपया कामकाजात अडथळा आणू नका", अशा शब्दांत सैकिया यांनी वर्षा गायकवाड यांना स्पष्ट इशारा दिला.