तुळजापूर (जि.धाराशिव) - मुख्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी १८६६ कोटींच्या मंदिर विकास आराखड्याला तत्त्वत: मंजुरी दिली असल्याची घोषणा केली. तसेच या आराखड्यातील आवश्यक कामाला लगेचच सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
तुळजापुरात प्रथम देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराच्या स्वनिधीतून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. गाभाऱ्याला पडलेले तडेही त्यांनी पाहिले. यानंतर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण केले. १८६६ कोटी रुपयांच्या या आराखड्याला उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे.
वंशजांचे पुरावे मागणाऱ्यांनाही शासन करू...- माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विकास आराखड्याला आपण तत्त्वत: मंजुरी दिली आहे. येत्या दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण करून मंदिर परिसराचा कायापालट केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.- छत्रपती शिवाजी महाराज यांचा मान-सन्मान राखण्यासाठी लागेल ते करू. त्यांच्याविषयी अवमानास्पद बोलणाऱ्यांना कडक शासन करण्यासंदर्भात खा. छत्रपती उदयनराजे यांनी आपल्याकडे त्यांची भावना मांडली आहे. असे प्रकार करणाऱ्यांना नक्कीच कडक शासन केले जाईल. सोबतच वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्यांनाही शासन केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर कॉरिडाॅरसाठी ३ महिन्यांत भूसंपादनपंढरपूर : कोणत्याही प्रकारची लपवाछपवी न करता लोकांना विश्वासात घेऊन पंढरपूर शहरात आम्हाला कॉरिडाॅरचे काम सुरू करायचे आहे. पुढील तीन महिन्यांत जमीन अधिग्रहणाचे काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंढरपूरच्या दौऱ्यात दिली. यामुळे गत वर्षापासून पंढरपुरात कॉरिडाॅर होणार की नाही, याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कामाची पाहणी केली. मंदिरात सुरू असलेली कामे समाधानकारक होत आहेत.