... आहेत ती शहरे सुधारा
By Admin | Updated: January 21, 2016 03:43 IST2016-01-21T03:43:06+5:302016-01-21T03:43:06+5:30
शहरे सुधारण्यासाठी संवेदनशील, सुशिक्षित नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. शिवाय स्मार्ट सिटीचा हव्यास धरण्यापेक्षा आहेत

... आहेत ती शहरे सुधारा
मुंबई : शहरे सुधारण्यासाठी संवेदनशील, सुशिक्षित नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. शिवाय स्मार्ट सिटीचा हव्यास धरण्यापेक्षा आहेत ती शहरे सुधारली तरच शहरे खऱ्या अर्थाने स्मार्ट होतील, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टी.आय.एस.एसमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय अधिवेशनात केले.
देवनार येथील टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्समध्ये ‘रिथिंकीग सिटीज इन द साऊथ ग्लोबल’ या विषयावर आंतरराष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘शहर विकास’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शहरात मोठ्या प्रमाणावर होणारे खासगीकरण हे शहर विकासास हानीकारक आहे. त्यामुळे खासगीकरण ताबडतोब स्थगित करावे. तर प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर खंत व्यक्त केली. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी देशात अनेक विभागांची मंजूरी मिळवावी लागते. या लांबणाऱ्या प्रक्रियेत बदल करावा. तसेच शहरे विकसित करायची असतील तर शहरे बकाल करण्यास कारणीभूत असणाऱ्या ‘एसआरए’ प्रकल्पांवर वेसण घालावी, असे आंबेडकर म्हणाले. शिवाय भारतात निवडून आलेल्या महिलेला समान वागणूक दिली जात नाही. त्यासाठी महिलांनाही पुरुषांबरोबरीने स्थान देणारी व्यवस्था तयार व्हायला हवी, असे भारती शर्मा यांनी नमुद केले.
आंतरराष्ट्रीय अधिवेशनात भारतातील शहरांसोबत जकार्ता, रिओ द जिनेरो, कराची, इस्तंबूल या शहरांच्या समस्या आणि उपाययोजना चर्चिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)