अखेर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी
By Admin | Updated: July 20, 2014 01:12 IST2014-07-20T01:12:59+5:302014-07-20T01:12:59+5:30
बहुतांश अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्णत्वास येत असल्याने यंदा विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल की नाही याबद्दल निरनिराळे कयास लावण्यात येत होते. परंतु अखेर यावर पडदा पडला आहे.

अखेर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी
‘डीटीई’चे निर्देश : अभियांत्रिकी, फार्मसीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांना फायदा
नागपूर : बहुतांश अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्णत्वास येत असल्याने यंदा विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल की नाही याबद्दल निरनिराळे कयास लावण्यात येत होते. परंतु अखेर यावर पडदा पडला आहे. ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशादरम्यान मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १६ टक्के आरक्षण तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहे. परंतु अभियांत्रिकीसमवेत इतर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आरक्षण लागू करणे शक्य होणार नाही, अशी माहिती ‘डीटीई’च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करून त्या प्रवर्गांतर्गत मराठा समाजाचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाला अनुसरून २०१४-१५वर्षापासून अभियांत्रिकी व फार्मसीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्याचे निर्देश ‘डीटीई’ने दिले आहेत. आरक्षणांतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी अर्ज करताना जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे असे अधिसूनचेत स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)
थेट द्वितीय वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू
‘डीटीई’तर्फे अभियांत्रिकी व फार्मसीच्या अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना २८ जुलैपर्यंत ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कागदपत्रांची पडताळणी २९ जुलैपर्यंत करण्यात येईल. ३० जुलै रोजी तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर करण्यात येईल. तर ३ आॅगस्टला ‘डीटीई’च्या संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.