पदच्युत पंतप्रधानांवर चालणार महाभियोग
By Admin | Updated: May 8, 2014 23:27 IST2014-05-08T23:27:34+5:302014-05-08T23:27:34+5:30
थायलंडमधील राष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने पदच्युत पंतप्रधान इंगलुक शिनवात्रा यांच्यावर वादग्रस्त तांदूळ अनुदान योजनेवरून गुरुवारी आरोप ठेवले.

पदच्युत पंतप्रधानांवर चालणार महाभियोग
बँकाक : थायलंडमधील राष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने पदच्युत पंतप्रधान इंगलुक शिनवात्रा यांच्यावर वादग्रस्त तांदूळ अनुदान योजनेवरून गुरुवारी आरोप ठेवले. आता या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महाभियोग चालणार असून तो मंजूर झाल्यास त्यांना पाच वर्षे राजकारणापासून दूर राहावे लागेल. इंगलुक यांच्यावर आरोप ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने एकमताने घेतला, असे आयोगाचे प्रमुख पान्थेप क्लानारोंग यांनी गुरुवारी सांगितले. समितीने त्यांच्याविरुद्धच्या प्रकरणाची चौकशी केली असून खटला सुरू करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे आढळून आले आहे. आम्ही हे प्रकरण आता संसदेकडे पाठवत आहोत, असेही क्लानारोंग म्हणाले. तांदूळ अनुदान योजनेखाली सरकारने देशातील शेतकर्यांकडून जागतिक बाजारपेठेतील किमतीहून कितीतरी अधिक दराने तांदूळ खरेदी केला. मात्र, यामुळे तांदळाचा साठा प्रचंड वाढून त्याचा देशाच्या तांदूळ निर्यातीला प्रचंड फटका बसला. ही योजना अत्यंत खर्चिक होती आणि त्यात भ्रष्टाचारालाही प्रचंड वाव होता, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. सत्तेचा दुरुपयोग केल्यावरून घटनापीठाने शिनवात्रा यांच्यासह त्यांच्या नऊ मंत्र्यांना बुधवारी पदावरून हटविले होते. (वृत्तसंस्था) २०११ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची गैरमार्गाने करण्यात आलेल्या बदलीत शिनवात्रा यांचा हात असल्याचे सांगत घटनापीठाने काल त्यांना बडतर्फ केले होते. मात्र, शिनवात्रा यांच्या समर्थकांना न्यायालय त्यांच्याबाबत भेदभाव करीत असल्याचे वाटते. नोव्हेंबर २०१३ मध्ये सरकारविरोधी निदर्शकांनी आंदोलन पुकारल्यापासून थायलंडमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. पंतप्रधान शिनवात्रा यांनी हे संकट सोडविण्यासाठी मध्यावधी निवडणूक घेतली. त्यात त्यांचा विजय झाला; मात्र न्यायालयाने ही निवडणूक घटनाबाह्य ठरविली. ४शिनवात्रा यांना पदच्युत करणार्या घटनापीठाच्या न्यायाधीशांमध्ये समावेश असलेल्या सुफोत कॅमुक यांच्यावर घरावर गुरुवारी एक हातबॉम्ब फेकण्यात आला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. न्यायाधीश कॅमुक यांच्यावर उत्तररात्री २ वाजता एम-६७ नामक हातबॉम्ब फेकण्यात आला. या स्फोटात एक वाहन व छताचे काही प्रमाणात नुकसान झाले. कॅमुक यांच्यासह नऊ न्यायाधीशांनी शिनावात्रा यांना सत्तेच्या दुरुपयोगाबद्दल पदच्युत केले होते. हल्ला झाला तेव्हा कॅम्युक घरी नव्हते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.