अमर साबळेंच्या पुतळ्यांचे दहन
By Admin | Updated: May 14, 2017 00:52 IST2017-05-14T00:52:12+5:302017-05-14T00:52:12+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्य निवडीवरून भारतीय जनता पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी पिंपरीतील मोरवाडीतील भाजपा कार्यालयात राडा केला.

अमर साबळेंच्या पुतळ्यांचे दहन
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्य निवडीवरून भारतीय जनता पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी पिंपरीतील मोरवाडीतील भाजपा कार्यालयात राडा केला. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना स्वीकृतची बक्षिसी दिल्याबद्दल खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड़ सचिन पटवर्धन यांच्या पुतळ्यांचे दहन केले.
पुण्याप्रमाणेच पिंपरीतील भाजपात गटबाजीचे राजकारण सुरू झाले असून, खासदार साबळे आणि अॅड. पटवर्धन यांच्या विरोधात भाजपाच्या नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांनी बंड केले आहे.
स्वीकृतचे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाकडून नावांची घोषणा होत नव्हती. त्यामुळे पक्षनेते एकनाथ पवार आणि पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाणवे यांच्या आदेशाची वाट पाहत होते. दोनवेळा मुदतवाढ घेतल्यानंतर पाच तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा एसएमएसवरून भाजयुमोचे मोरेश्वर शेडगे, माउली थोरात, बाबू नायर यांची नावे पाठविली. त्यावर खासदार साबळे समर्थक थोरात, पटवर्धन समर्थक नायर यांच्या निवडीबद्दल भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.
बैठक सुरू असतानाच काही कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर आले. मिथुन मथुरे, नीलेश अष्टेकर यांनी साबळे आणि पटवर्धनांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पुतळ्यांचे दहन केले. तसेच कार्यालयातील दोघांच्या छायाचित्राला काळे फासले. अचानक घडललेल्या प्रकाराने सर्वांची तारांबळ उडाली होती.
भाजपा नेतृत्वाने घेतलेला निर्णय शिरोधैर्य मानण्याची परंपरा पक्षात आहे. संस्कारित परंपरेला काळिमा फासण्याचे काम केले आहे. गैरप्रकार असून भ्याड हल्ला आहे. भाजपा विचारधारा, संस्कृतीशी अनभिज्ञ असणाऱ्या लोकांचे गैरकृत्य निषेधार्ह आहे. स्वीकृत सदस्य निवडीचाही निर्णय मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षांनी एकमताने घेतला होता. नेतृत्वाविरोधातील गैरप्रकाराची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.
-अमर साबळे (खासदार)
स्वीकृत सदस्यपद निवडीबाबत पक्षश्रेष्ठींकडून सूचना आल्यानंतर, आम्ही आयुक्तांना नावे दिली. त्या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पक्ष कार्यालयात आजही काही कार्यकर्ते आले होते. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्षाची बदनामी होईल, प्रतिष्ठेला बाधा येईल, याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यायला हवी. भाजपाला विचारधारा आहे. आपल्या भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहोचविल्या जातील.
- एकनाथ पवार, पक्षनेते
कलेक्शन करणाऱ्यास संधी कशी?
महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या आणि नेत्यांचे कलेक्शन करणाऱ्या थोरात यांना स्वीकृतची बक्षीसी दिली. तसेच दीड वर्षांपूर्वी पक्षात दाखल झालेल्या नायर यांना कोणत्या निकषाने संधी दिली. केवळ नेत्यांमागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षाने ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे.
>पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्य निवडीवरून पुण्याप्रमाणे पिंपरीतही कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त झाला. खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड़ सचिन पटवर्धन यांच्या पुतळ्यांचे भाजपामधील नाराज कार्यकर्त्यांनी शनिवारी दहन केले.