अमरापूरकरांच्या अस्थींचे विधी न करता विसर्जन
By Admin | Updated: November 17, 2014 03:36 IST2014-11-17T03:36:35+5:302014-11-17T03:36:35+5:30
ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांच्या इच्छेनुसार धर्मपरंपरेनुसार कोणताही विधी न करता त्यांच्या अस्थींचे शेतात विसर्जन करण्यात आले

अमरापूरकरांच्या अस्थींचे विधी न करता विसर्जन
अहमदनगर : ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांच्या इच्छेनुसार धर्मपरंपरेनुसार कोणताही विधी न करता त्यांच्या अस्थींचे शेतात विसर्जन करण्यात आले. अमरापूरकर यांनी मृत्यूनंतर एकप्रकारे नव्या पिढीला पुरोगामी विचारांचे संस्कार दिले.
दशक्रिया व त्यानंतरचा तेराव्याचा विधीही त्यांच्या कुटुंबियांनी केला नाही़ तसेच वर्षश्राद्धही होणार नाही़ माझ्या मृत्यूनंतर माझा कुठलाही धार्मिक विधी करू नका, फक्त माझे विचार, कार्य आणि संस्कार जिवंत ठेवा, अशी अमरापूरकरांची इच्छा होती़
सजग अभिनयाने चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजविणारे नगरचे भूमिपुत्र सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबरला मुंबईत निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या मुलींनी त्यांना अग्नी दिला़ एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर प्रत्येक धर्मात एक वर्ष मोठा धार्मिक विधी असतो़ मात्र, अमरापूरकर यांनी आयुष्यभर सामाजिक चळवळीशी संबंध ठेवून पुरोगामी विचारांची जोपासना केली़
अंधश्रद्धा कर्मकांडाला विरोध केला़ त्यांच्या इच्छेनुसार निधनाच्या दुसऱ्या दिवशी अस्थींचे धार्मिकस्थळी विसर्जन न करता त्यांच्या खंडाळा येथील शेतात आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्यात आली़ वृक्षांच्या खोडाला अस्थी समर्पित करण्यात आल्या़
अशा प्रकारे सामाजिक चळवळीशी बांधिलकी जपणारा आणि पुरोगामी विचारांची शिदोरी घेऊन वावरणारा माणूस मरणानंतरही पुरोगामी विचार पुढच्या पिढीला देवून गेला. त्यांच्या या विचारांचा ठसा समाजावर कायम राहील, अशी भावना व्यक्त झाली. (प्रतिनिधी)