अवैध थांबे लावताहेत ‘आयुष्याला ब्रेक’
By Admin | Updated: November 16, 2014 23:34 IST2014-11-16T22:09:23+5:302014-11-16T23:34:06+5:30
महामार्गावर उभे राहणे जीवघेणे : खासगी वाहनांच्या थांब्यांवर कुणाचेही नाही नियंत्रण ---हायवेवर मृत्यूचा सापळा

अवैध थांबे लावताहेत ‘आयुष्याला ब्रेक’
दत्ता यादव --सातारा चौपदरी महामार्गावर उभारण्यात आलेल्या ब्रीजवर अधिकृत थांबे नसतानाही काही चालक केवळ आळस म्हणून सेवा रस्त्यावर एसटी नेत नाहीत. ब्रीजच्या कडेला एसटी उभी राहत असल्यामुळे जीव धोक्यात घालून मृत्यूच्या सावलीला उभे राहण्याची सवय प्रवाशांना लागली आहे. अशा नियम मोडणाऱ्यांवर जिल्हा वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे रोज अनेक लोक जायबंदी होत आहेत.
पारगाव खंडाळा येथे महामार्गाच्या कडेला एसटीची वाट पाहात उभ्या असलेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एसटी चालकांनी ब्रीजवर वाहने न थांबविता सर्व्हिस रस्त्यावर थांबविली असती तर लोकांचे प्राण वाचले असते, असा मुद्दा यानिमित्ताने पुढे आलाय. मात्र, अशा नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या यंत्रणाच ढिम्म झाल्याने अनेक प्रवाशांना जीवाला मुकावे लागत आहे. नवीन चौपदरी हायवे झाल्यानंतर ब्रीज उभारण्यात आले. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली; परंतु अनेक वाहनचालक त्याचा गैरफायदाही घेत आहेत.
वास्तविक अशा ब्रीजवर वाहनांना थांबण्यास सक्त मनाई असते; मात्र काही एसटी चालक सेवा रस्त्यावर जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो म्हणून महामार्गावरच एसटी उभी करतात. प्रवाशांना त्याची सवय झाल्याने अनेक प्रवासी रोज महामार्गावर उभे राहिलेले दिसतात. कऱ्हाड ते खंडाळादरम्यान सुमारे पाच मोठे ब्रीज आहेत. त्यामध्ये कऱ्हाड, उंब्रज, सातारा, खंडाळा, शिरवळ या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच अतीत, नागठाणे, शेंद्रे, बॉम्बे रेस्टॉरंट, भुर्इंज या ठिकाणी ब्रीज नसले तरी महामार्गावर प्रवासी वाहनांची वाट पाहात उभे असतातच.
काही खागसी वाहनेही महामार्गावर वडाप करतात. वेळ आणि पैसा वाचतो, असे समजून काहीजण महामार्गावर मिळेल त्या वाहनाने प्रवास करतातात. जिल्हा वाहतूक शाखा, महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा अशा अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असतो; मात्र ही ‘खाकी’ नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई न करता चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देण्यात धन्यता मानते. अशा प्रकारची घटना घडल्यानंतरच या यंत्रणा कार्यान्वित होतात. आता या घटनेतून तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोध घ्यावा, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.
महामार्गावरील अनाधिकृत थांबा बंद करण्यात यावा, याबाबत वारंवार ठराव खंडाळा पंचायत समिती, पारगाव, खंडाळा ग्रामपंचायतीने एस. टी. प्रशासनाला लेखी व तोंडी स्वरूपात दिला आहे. तरीही याकडे दुर्लक्ष झाले. अपघाताच्या ठिकाणची एस. टी. सुरू नसती तर कंटेनरमुळे भयंकर स्थिती निर्माण झाली असती.
महामार्गावर अधिकृतरीत्या दिलेल्या थांब्यांवर एसटी उभी करता येते. अन्यत्र उभी करता येत नाही. अनेक प्रवासी बसस्थानकात जाण्याचा कंटाळा करतात. त्यांच्यासाठी महामार्गावर एसटी न थांबल्यास अनेकवेळा तक्रारीही येत असतात. त्यामुळे प्रवाशांनी महामार्गावर हात केल्यास वाहन थांबवावे लागते; मात्र या अपघातावेळी एसटी त्या ठिकाणी थांबलेली नव्हती. दोन्ही वाहने पुण्याकडे निघाली होती.
- धनाजी थोरात, विभाग नियंत्रक
ठरावाचे काय ?
महामार्गावरील अनाधिकृत थांबा बंद करण्यात यावा, याबाबत वारंवार ठराव खंडाळा पंचायत समिती, पारगाव, खंडाळा ग्रामपंचायतीने एस. टी. प्रशासनाला लेखी व तोंडी स्वरूपात दिला आहे. तरीही याकडे दुर्लक्ष झाले. अपघाताच्या ठिकाणची एस. टी. सुरू नसती तर कंटेनरमुळे भयंकर स्थिती निर्माण झाली असती.