आधी बेकायदेशीर मशीदी पाडा मग उपदेशाची पोकळ बांग द्या - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: June 8, 2015 15:56 IST2015-06-08T10:04:09+5:302015-06-08T15:56:52+5:30
शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला विरोध करणा-या एमआयएमने आधी बेकायदेशीर मशिदी पाडाव्यात आणि मगच उपदेशाची पोकळ बांग द्यावी, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

आधी बेकायदेशीर मशीदी पाडा मग उपदेशाची पोकळ बांग द्या - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - छत्रपती शिवाजी महाराजा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला विरोध करणा-या एमआयएमने आधी बेकायदेशीर मशिदी पाडाव्यात आणि मगच उपदेशाची पोकळ बांग द्यावी, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून एमआयएमवर आज जोरदार पलटवार करण्यात आला आहे.
' महाराष्ट्रातील हजारो मशिदी व दर्गे सरकारी जमिनींवर बेकायदेशीरपणे उभारले गेले आहेत व या अतिक्रमणामुळे विकासकामात अडथळे निर्माण होत आहेत. या सर्व मशिदी तोडा असे ‘एमआयएम’वाले सांगणार आहेत काय?' असा सवाल लेखात विचारण्यात आला आहे. ' ते तसे बोलत असतील तरच त्यांचा विकासाचा मुद्दा पक्का व सच्चा असे आम्ही मानायला तयार आहोत' असेही लेखात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात राहून शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकांना विरोध करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. सरकारने सरकारी जागांवर जनतेच्या पैशांतून स्मारक बांधू नये, सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा ‘एमआयएम’च्या आमदाराने दिला आहे. भावना भडकवणार्या, दोन समाजांत तणाव निर्माण करणार्या या वक्तव्याबद्दल संबंधित आमदारांवर गुन्हा दाखल करून त्या पक्षाची मान्यता रद्द करायला हवी अशी मागणीही लेखात करण्यात आली आहे. जे लोक ‘वंदे मातरम्’ला विरोध करून हिंदुस्थानला मातृभूमी मानण्यास नकार देतात ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत, त्यांनी या देशातील तसेच महाराष्ट्रातील प्रेरणास्थानांच्या बाबतीत नाक खुपसण्याचे कारण नाही, असे लेखात म्हटले आहे.
एमआयएमने औरंगाबादमध्ये प्रस्तावित गोपीनाथ मुंडेच्या स्मारकासह शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामनातून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे...