‘आयआयएम’@ नागपूर

By Admin | Updated: December 25, 2014 00:31 IST2014-12-25T00:31:38+5:302014-12-25T00:31:38+5:30

महाराष्ट्र राज्यातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) नागपुरातच स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात बुधवारी

'IIM' @ Nagpur | ‘आयआयएम’@ नागपूर

‘आयआयएम’@ नागपूर

विनोद तावडेंची घोषणा : जागतिक नकाशावर येणार उपराजधानी
नागपूर : महाराष्ट्र राज्यातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) नागपुरातच स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात बुधवारी विधान परिषदेत घोषणा केली. मुंबई, पुणे, औरंगाबाद ही शहरे शर्यतीत असताना उपराजधानीने यात बाजी मारली. ‘लोकमत’ने यासंदर्भात सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता हे विशेष.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने राज्यात ‘आयआयएम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार करण्यात आला. मुंबई, पुणे या शहरांत जागेची वानवा असल्यामुळे औरंगाबाद आणि नागपूरमध्येच यासाठी खरी चुरस होती. यासंदर्भात विधिमंडळात दोन्ही विभागांच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
‘आयआयएम’ नेमके कुठे जाणार हे अधिवेशनातच स्पष्ट होईल असे सूतोवाच राज्य शासनाकडून करण्यात आले होते. ‘फ्लेम’ विद्यापीठ विधेयकावर चर्चा सुरू असताना विनोद तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली. राज्यातील पहिल्या ‘आयआयएम’साठी शासनाने नागपूरची निवड केली असून यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येणार आहे.
विधिमंडळात ‘लोकमत’ची चर्चा
‘लोकमत’ने ‘आयआयएम’चा मुद्दा हिवाळी अधिवेशनादरम्यानदेखील लावून धरला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने सरकारचे लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित केले होते. नागपूरचे लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन विधिमंडळात मागणी उपस्थित केली होती. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ‘आयआयएम’चे ‘गिफ्ट’ नागपूरला मिळाल्याचे कळताच नागपुरातील जनप्रतिनिधींमध्ये आनंदाचे वातावरण होते. ‘लोकमत’ने नागपूरच्या विकासासाठी घेतलेल्या भूमिकेचीदेखील आमदारांमध्ये चर्चा होती.
नागपूर होणार शैक्षणिक ‘हब’
‘आयआयएम’सारखी संस्था नागपुरात येणे ही अभिमानास्पद बाब आहे. एकत्रित प्रयत्नांमुळे मिळालेले हे यश आहे. अत्युच्च दर्जाच्या या व्यवस्थापन संस्थेमुळे नागपूरचा शैक्षणिक दर्जा निश्चितच वाढणार आहे. विशेष म्हणजे जागतिक नकाशावर उपराजधानीचे नाव येणार आहे. शिवाय विदर्भातील तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सर्वोत्तम संधी प्राप्त होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरची ओळख शैक्षणिक ‘हब’ म्हणून प्रस्थापित होईल असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी व्यक्त केली.
का झाली नागपूरची निवड?
नागपुरात आजच्या तारखेत ‘व्हीएनआयटी’ सोडले तर मोठे शैक्षणिक केंद्र नाही. ‘ट्रीपल आयटी’, ‘महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी’, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्था अद्याप कागदावरच आहेत. नागपूरचे भौगोलिक स्थान, येथे उपलब्ध असलेल्या दळणवळणाच्या सुविधा, शैक्षणिक अनुशेषाचा मुद्दा तसेच भविष्यातील प्रगतीच्या संधी लक्षात घेता नागपूरची निवड करण्यात आली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर स्पष्ट केले. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असून यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या चमूतर्फे लवकरच उपलब्ध जागेची तसेच तात्पुरत्या जागेचीदेखील पाहणीदेखील करण्यात येईल.
नागपूर-औरंगाबादमध्ये होती चुरस
नागपूर व औरंगाबाद या दोन शहरांतच ‘आयआयएम’साठी चुरस होती. तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी नागपूरसंदर्भात पुढाकार घेतला होता. नागपुरात मिहान येथील २०० एकर जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. तात्पुरते वर्ग सुरू करण्यासाठी ‘व्हीएनआयटी’ने चार एकर जागा व दोन इमारती देण्याची तयारी दाखवली होती. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील स्वतंत्र इमारत देण्याची तयारी दाखविली होती.

Web Title: 'IIM' @ Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.