भर पावसात परीक्षा घेण्याचा IGNOU चा प्रताप, विद्यार्थ्यांचा मनस्ताप
By Admin | Updated: June 19, 2015 16:22 IST2015-06-19T16:21:23+5:302015-06-19T16:22:36+5:30
मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील जनजीवन ठप्प पडले असतानाच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने भर पावसातही परीक्षा घेण्याचा घाट घातला.

भर पावसात परीक्षा घेण्याचा IGNOU चा प्रताप, विद्यार्थ्यांचा मनस्ताप
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील जनजीवन ठप्प पडले असतानाच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने भर पावसातही परीक्षा घेण्याचा घाट घातला. विद्यापीठाच्या दिल्ली व मुंबईतील अधिका-यांमधील समन्वयाअभावी ऐन पावसातही या परीक्षा पार पडल्याने विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेलाच मुकावे लागले.
मुंबईत गुरुवारी रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी सकाळपासून तिन्ही मार्गांवरील लोकल सेवाही ठप्प असून रस्त्यांवरही पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतुकही मंदावली आहे. दुपारी असलेली समुद्रातील भरती व मुसळधार पाऊस या पार्श्वभूमीवर मुंबई व ठाण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. तर मुंबई विद्यापीठानेही आजच्या सर्व लेखी व तोंडी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मात्र इंदिरा गांधी विद्यापीठाला मुंबईतील परिस्थितीचा विसरच प़ड़ला.
शुक्रवारी सकाळी मुक्त विद्यापीठाच्या सोमेय्या महाविद्यालयातील केंद्रावर नियोजित वेळेतच परीक्षा पार पडल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. काही जण परीक्षा संपण्याच्या काही मिनीटांपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचले. तर अनेकांना परीक्षेलाच मुकावे लागले. याविरोधात एका विद्यार्थ्यांनी स्थानिक अधिका-यांकडे लेखी तक्रारही दिली आहे. मुंबईतील जनजीवन ठप्प पडले असताना विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला पाहिजे हवा होता असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दिल्लीतील अधिका-यांकडून काहीची आदेश न आल्याने आम्ही नियोजीत वेळेतच परीक्षा घेतल्या असे विद्यापीठाच्या सोमेय्या केंद्रातील अधिका-यांनी सांगितले.