नोटीसकडे दुर्लक्ष भोवले
By Admin | Updated: August 1, 2016 04:30 IST2016-08-01T04:30:02+5:302016-08-01T04:30:02+5:30
गैबीनगर भागातील कबीर सेठ यांची इमारत अतिधोकादायक ठरल्याच्या नोटिसा इमारतीच्या मालकाला आणि भाडेकरूंना बजावण्यात आल्या होत्या

नोटीसकडे दुर्लक्ष भोवले
भिवंडी : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील गैबीनगर भागातील कबीर सेठ यांची इमारत अतिधोकादायक ठरल्याच्या नोटिसा इमारतीच्या मालकाला आणि भाडेकरूंना बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका सात कुटुंबांना बसला आणि त्यात नऊ जणांना जीव गमवावा लागला. यानिमित्ताने भिवंडीसह ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारती, त्यातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
सकाळी इमारत कोसळताच जवळच्या मशिदीतून परिसरातील नागरिकांना मदतीचे आवाहन सुरू झाले. त्यामुळे परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन आपत्ती व्यवस्थापन, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व पोलिसांना फोन करून घटनास्थळी पाचारण केले. तसेच जेसीबी बोलवून रस्त्यावर पडलेला स्लॅबचा ढिगारा लगेचच बाजूला केला. दोन रुग्णवाहिकांद्वारे जखमींना इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्याचे काम सुरू केले. मृतदेह हलवण्यासाठी मदत केली. इमारत कोसळली, तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. त्याची तमा न बाळगता तरुणांचे मदतकार्य सुरूच होते. इमारतीखालील यंत्रमाग कारखाना बंद असल्याने त्यामधील कामगार सुरक्षित राहिले.
जसजसे ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढले जात होते, तेव्हा परिसरातील नागरिकांना हुंदके फुटत होते. परिसरातील महिलांनीही परिचयाच्या व्यक्तींच्या शोधासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात गर्दी केली होती. घटनास्थळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले व रूपेश म्हात्रे, आयुक्त ई. रवींद्रन, ठाणे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी भेट दिली. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जवान पोहोचल्यावर त्यांनीही मदतकार्य सुरू केले. दुपारनंतर त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक मागवले होते. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षानेही नागरिकांच्या साहाय्याने सुरुवातीचे मदतकार्य सुरू ठेवले होते. दुपारी साडेबारा वाजता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्या आवाजाचा वेध घेऊन जवानांनी त्या चिमुकल्याला बाहेर काढले. तत्पूर्वी जैद अन्सारी या सहा वर्षांच्या मुलाला बाहेर काढून त्याच्यावर उपचार सुरू केले होते. (प्रतिनिधी)
>इंदिरा गांधी रुग्णालयात गर्दी
सर्व जखमींना व मृतांना पाहण्यासाठी, ओळख पटवण्यासाठी, आपल्या परिचयातील व्यक्तींच्या शोधासाठी घटनास्थळी आणि इंदिरा गांधी रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. इंदिरा गांधी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असताना त्यांचे नातेवाईक फोटो काढू देत नव्हते. इतर कोणासही भेटू देत नव्हते. ढिगारा उपसण्याचे काम अजूनही सुरू असून सायंकाळनंतर नव्याने कोणीही सापडलेले नाही.