राष्ट्रपती पदकविजेत्याची उपेक्षा
By Admin | Updated: July 10, 2016 02:45 IST2016-07-10T02:45:38+5:302016-07-10T02:45:38+5:30
कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी राहणाऱ्या निसर्गाची भाषा जाणणाऱ्या, पशु-पक्ष्यांचे आवाज हुबेहुब काढणाऱ्या राष्ट्रपती पदकविजेत्या वृद्ध कलावंताला भाकरीच्या शोधात वणवण फिरावे लागत

राष्ट्रपती पदकविजेत्याची उपेक्षा
- साहेबराव नरसाळे, अहमदनगर
कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी राहणाऱ्या निसर्गाची भाषा जाणणाऱ्या, पशु-पक्ष्यांचे आवाज हुबेहुब काढणाऱ्या राष्ट्रपती पदकविजेत्या वृद्ध कलावंताला भाकरीच्या शोधात वणवण फिरावे लागत आहे. विशेष म्हणजे वृद्ध कलाकारांचे अनुदानही त्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.
कळसुबाई शिखराच्या पायथ्याला अकोले तालुक्यातील उडदावणे हे २,३०० लोकसंख्येचे गाव वसले आहे. पावसाळ््यात फेसाळणारे धबधबे, उंचच उंच पर्वतराजी आणि हिरवाईने नटलेला परिसर, अशी निसर्ग संपन्नता गावाला लाभली आहे. येथील आदिवासी कुटुंबात ठकाबाबांचा जन्म झाला. गावातच खडकाळ माळरानावर त्यांची तीन एकर शेती आहे. पण पाणी नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर केवळ भाताचे पीक वगळता काहीही पिकत नाही.
घरात सात माणसे आहेत. उपजीविकेचे दुसरे साधनही नाही. त्यामुळे ठकाबाबांनी त्यांच्यातील कला जगासमोर ठेवली. त्यातून चार पैसे मिळत गेले. राष्ट्रपती, पंतप्रधान यांनीही ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. अनेक संस्थांनी ठकाबाबांना पुरस्कार देऊन गौरविले.
सह्याद्रीच्या डोंगररांगात रोरावणारा वारा, धुवाँधार कोसळणारा पाऊस, फेसाळलेले धबधबे, ओढेनाल्यांचा खळखळाट, बिबट्यांच्या डरकाळ्या, मोरांचे केकाटणे रोजच त्यांच्या कानी पडायचे. जंगलात गुरे चारताना ठकाबाबांना पशु-पक्ष्यांच्या आवाजाला प्रतिसाद देण्याची सवय लागली आणि तेही त्यांचा आवाज काढू लागले. नवी दिल्ली येथे १९६५ मध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यक्रमात ठकाबाबांच्या पथकाने महाराष्ट्रातून आदिवासी कलेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या पथकाने देशात प्रथम क्रमांक पटकावला. २००५ मध्ये महाराष्ट्र सरकारनेही त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविले. अनेक संस्थांनी ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. ठकाबाबा ‘सेलिब्रिटी’ झाले. त्यामुळे त्यांना आदिवासी वेशभूषा सोडून निटनेटके राहणीमान अंगिकारावे लागले. त्यासाठी मात्र त्यांना कर्ज काढावे लागले. ८४ वर्षांच्या ठकाबाबा यांचे हातपाय आता थरथरतात. उत्पन्नाअभावी बँकेच्या कर्जाचे हप्तेही आता थकले आहेत.
मंत्र्यांची आश्वासनेही विरली
अनेक मंत्री, अधिकाऱ्यांनी ठकाबाबांची पाठ थोपटली, त्यांची माहितीही नेली. कलाकाराचे मानधन देऊ असे आश्वासन दिले. पण अद्याप त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यांचा मुलगा सखाराम हा शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवतोय.