धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: July 31, 2016 01:25 IST2016-07-31T01:25:29+5:302016-07-31T01:25:29+5:30

पिंपरी-चिंचवडमधील धोकादायक इमारतींकडे महापालिकेचे दुर्लक्ष असून, केवळ नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कडक कारवाई होत नाही.

Ignore dangerous buildings | धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष

धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष


पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील धोकादायक इमारतींकडे महापालिकेचे दुर्लक्ष असून, केवळ नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कडक कारवाई होत नाही. महापालिकेच्या आकडेवारीनुसार एकशे पाच इमारतींना नोटिसा दिल्या आहेत. मात्र, बांधकाम प्रकल्पावरील असुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकाराची कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बालेवाडी येथील इमारतीचा स्लॅब पडून ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बांधकाम प्रकल्पांवर धोकादायक पणे सुरू असणारे काम तसेच धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका क्षेत्रात गावठाणाच्या परिसरातच धोकादायक जुने वाडे आहेत. तीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या मोठ्या इमारती नाहीत, अशी महापालिकेची आकडेवारी सांगते.
गावठाणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जुने वाडे, इमारती आहेत. त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, निगडी, थेरगाव, वाकड, पिंपळे गुरव, निलख, चिखली, भोसरी, दिघी, चऱ्होली, दापोडी, बोपखेल या भागातील गावठाणात जुनी घरे, वाडे अधिक आहेत. त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. जुन्या घरांच्या इमारतीच्या भिंती कधीही पडू शकतात अशा स्थितीत आहेत. चिंचवड, भोसरी, चऱ्होली, पिंपरीत अधिक प्रमाणावर जुन्या इमारती आहेत. पावसाळ्यात त्या पडण्याचा धोका अधिक असतो. धोकादायक इमारतींना नोटीस देण्यापलीकडे महापालिका कोणतीही ठोस कारवाई करीत नाही. नोटीस देण्याचे काम वर्षानुवर्षे सुरूच आहे. बांधकाम प्रकल्पावरील सुरक्षेच्या उपाय योजनांच्या तपासणीबाबत पालिकेकडे यंत्रणा नाही. त्यामुळे घटना घडल्यानंतर प्रकल्पांवरील तांत्रिक अडचणींच्या मुद्द्यांवर केवळ नोटीस देण्यापलीकडे काहीही होत नाही. दरम्यान, अशिक्षित व असंघटित असलेल्या मजुरांबाबत कोणी आवाजही उठवत नसल्याने त्यांना कोणतीही सुरक्षा साधने पुरवली जात नाहीत. त्यांच्या जिवाची ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांना पर्वा नाही. कायमचे जायबंदी झालेल्या मजुरांना लाभही मिळत नाहीत. (प्रतिनिधी)
>शिरीष पोरेड्डी : धोकादायक इमारती पाडणार
महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी म्हणाले, ‘‘आपल्या शहरात तीस ते पन्नास वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारती फार नाहीत. गावठाणाच्या परिसरातील वाडे आणि बैठ्या घरांची संख्या असल्याने ज्याचे छत, भिंत धोकादायक आहे, अशा सर्वांना नोटिसा देण्यात येतात. गेल्या वर्षी अ, ब, क, ड, इ, फ या सहा प्रभागांतील जुन्या १०५ इमारतींना नोटिसा दिल्या आहेत. या वर्षीही नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. ज्या खूपच धोकादायक आहेत. अशा इमारतींचे आॅडिट करून त्या पाडण्यात येतात.’’

Web Title: Ignore dangerous buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.