अमरावती परिक्षेत्राच्या ‘आयजीं’ची आत्महत्येची धमकी व्हायरल!
By Admin | Updated: November 7, 2016 23:20 IST2016-11-07T23:20:43+5:302016-11-07T23:20:43+5:30
विठ्ठल जाधव यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांनाच आत्महत्येची कथित धमकी दिल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे

अमरावती परिक्षेत्राच्या ‘आयजीं’ची आत्महत्येची धमकी व्हायरल!
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 7 - अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांनाच आत्महत्येची कथित धमकी दिल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. जाधव यांनी माध्यमातील काही मित्रांच्या मोबाईलवर पोलीस महासंचालकांना उद्देशून टाईप केलेला संदेश पाठविल्याने हा प्रकार उघड झाला. सोशल मीडियावर हा संदेश व्हायरल झाल्याने आयपीएस आणि महाराष्ट्र पोलीस सेवेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
सूत्रानुसार, आयजी जाधव यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना उद्देशून मोबाईलवरून संदेश पाठविला. 'मी मराठा असल्याने आपण मला लक्ष्य करीत आहात, त्यामुळे मी आत्महत्या करणार असून त्या आत्महत्येला आपण जबाबदार असाल' असा इशारा जाधव यांनी महासंचालकांना पाठविलेल्या संदेशातून दिला आहे. आपणाकडून होणारी सततची अवहेलना सहनशिलतेपलिकडची आहे. आत्महत्येपूर्वी याबाबतची प्रत्येक गोष्ट माध्यम आणि कौटुंबिक सदस्यांकडे मांडणार असल्याचे त्यांनी या संदेशातून म्हटल्याचेसुद्धा व्हायरल झाले आहे. जाधव यांनी आत्महत्येची धमकी देणारा हा संदेश काही पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉटसअॅपवर पाठविल्यानंतर तो संदेश त्यातीलच काही अधिकाऱ्यांकडून डीजीपींकडे ‘फॉरवर्ड’ करण्यात आला आहे. हा संदेश सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्रासह राज्याच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. आयजी विठ्ठल जाधव यांनी केलेले आरोप डीजीपी माथूर यांनी नाकारले आहे. जाधव हे नशेच्या अमलाबाहेर आले असतील तर वस्तुस्थिती त्यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया माथूर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या काळात उमरखेड येथे झालेल्या धार्मिक दंगलीसाठी जबाबदार असल्याचा ठपका आपण जाधव यांच्यावर ठेवला होता, असेही माथूर यांनी सांगितले.
राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून माझी सर्वंकष जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने अधिनस्त यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या जातात. तशा सूचना जाधव यांनासुद्धा देण्यात आल्यात. जाधव यांच्या आत्महत्येच्या कथित धमकीसंदर्भात संदेश त्यांनी माध्यमातील त्यांच्या मित्रांना पाठविला. मद्याच्या अमलात असताना त्यांनी कुणाला काय संदेश पाठविला, याबाबत मला सांगता येणार नाही.
- सतीश माथूर, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
आत्महत्येच्या कथित धमकीसंदर्भात आयजींसोबत संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, त्यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींना परत पाठविले. आपल्याला यासंदर्भात काहीही बोलायचे नाही, अशी सूचना त्यांच्या अधिनस्तानांकडून माध्यमाच्या प्रतिनिधींना देण्यात आली. दरम्यान सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता प्रकृती बरी नसल्याने कुणासही भेटू इच्छित नसल्याचे ते म्हणाले. काही वेळातच ते त्यांच्या कार्यालयात दाखल झाले. मात्र, त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भेट नाकारली.