मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे
By Admin | Updated: September 15, 2015 20:22 IST2015-09-15T18:36:28+5:302015-09-15T20:22:17+5:30
मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे नाहीतर रिक्षा चालवण्याचा परवाना मिळणार नाही अशी महत्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - मराठी बोलता येत नसेल तर मुंबईत रिक्षा चालवण्याचा परवाना मिळणार नाही असा आदेश परिवहन मंत्रालयातर्फे काढण्यात आला आहे. मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर रिक्षावाल्यांना मराठी येणं बंधकारक असल्याची महत्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली असून यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.
येत्या काळात मुंबईत १ लाख नव्या रिक्षासांठी परवाने देण्यात येणार आहेत. तसेच परवाने रद्द झालेल्या सुमारे १ लाख ४० हजार ऑटोरिक्षांना सरकारकडून पुन्हा परवाने देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून त्यासाठी १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
ज्या रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलता येईल त्यांनाच रिक्षा चालवण्याचा परवाना देण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार असून परवाना देण्यापूर्वी रिक्षा चालकांची मराठी भाषेची परीक्षा घेण्यात येणार आहे. ते जर त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच त्यांना परवाना देण्यात येईल, अन्यथा नाही असे रावते यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येक व्यक्तीला मराठी येणं गरजेचं आहे, मात्र त्यासाठी अशी सक्ती करणं चुकीचं आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहिर यांनी मांडली आहे.