सत्ता हवी तर तडजोडी होणारच - देवेंद्र फडणवीस
By Admin | Updated: September 29, 2014 18:35 IST2014-09-29T18:30:34+5:302014-09-29T18:35:01+5:30
समाजात चांगली काम करण्यासाठी सत्तेवर येणे गरजेचे असते व सत्तेवर येण्यासाठी काही तडजोडी कराव्याच लागतात असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सत्ता हवी तर तडजोडी होणारच - देवेंद्र फडणवीस
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - समाजात चांगली काम करण्यासाठी सत्तेवर येणे गरजेचे असते व सत्तेवर येण्यासाठी काही तडजोडी कराव्याच लागतात असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्यांच्या भाजपप्रवेशाचे समर्थन केले आहे. आपद्धर्म स्वीकारत आम्ही अनेकांना पक्षात सामावून घेतले असले तरी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हाच आमचा शाश्वत धर्म असल्याची मखलाशीही फडणवीस यांनी केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून यात त्यांनी युती, वादग्रस्त नेत्यांचा भाजपप्रवेश याविषयी भाष्य केले आहे. राजकारणात सत्तेत येणे गरजेचे असते. हा सर्व नंबर गेम असून यासाठी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावाच लागतो असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. भ्रष्टाचाराविरोधात भाजपनेच रान उठवले असून भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातून आघाडी सरकार पाडणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
गडकरींनी लहान भावाप्रमाणे प्रेम दिले
गडकरी व फडणवीस यांच्या मतभेद असल्याची चर्चा नेहमीच रंगते. याविषयी फडणवीस म्हणाले, गडकरी व माझे नैसर्गिक संबंध आहे. गडकरींनी पहिल्यांदा नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी ते आमच्याच घरी राहिले होते. गडकरींसोबतच मी राजकारणात यशस्वी वाटचाल केली. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढलो होतो. त्यांच्या कामाने मी प्रभावित झालो. गडकरी यांनी लहान भावाप्रमाणे तर गोपीनाथ मुंडेंनी थोरांप्रमाणे माझ्यावर प्रेम दिले असे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदासाठी युती तुटली
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्ही पाठिंबाच देऊ अशी भूमिका भाजपने यापूर्वीच जाहीर केली होते. भाजपचा स्ट्राईक जास्त असल्याने त्यांना जास्त जागा दिल्यास त्यांचे आमदार वाढतील व यामुळे मुख्यमंत्रीपद हातातून जाईल अशी भिती शिवसेनेला वाटत होती असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.