आबांनी ऐकले असते तर...
By Admin | Updated: February 19, 2015 23:49 IST2015-02-19T21:46:27+5:302015-02-19T23:49:50+5:30
अजित पवार : पवार कुटुंबीय आबांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी

आबांनी ऐकले असते तर...
सावळज : ‘कॉमन मॅन’चे प्रतिनिधित्व करणारा निर्मळ मनाचा नेता गेला. मी आबांना जे सांगितले होते, ते आबांनी त्याचवेळी ऐकले असते, तर ही वेळच आली नसती, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी आदरांजली वाहिली. आता पवार कुटुंबीय व स्वत: शरद पवारसाहेब आबांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. बारामती व वाळव्याप्रमाणे तासगाव-कवठेमहांकाळकडेही लक्ष देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम अंजनी (ता. तासगाव) येथे झाला. यावेळी पवार बोलत होते.
गुरुवारी सकाळी अंजनी-वडगाव रस्त्यावर पाटील यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी अनेक नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केली होती. दाटलेल्या अंत:करणाने हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या रक्षाविसर्जनाला उपस्थिती लावली होती. पाटील यांचे पुत्र रोहित यांच्या हस्ते विधिवत रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. पाटील यांचे बंधू राजाराम, सुरेश, मातोश्री भगीरथी, पत्नी सुमन, कन्या स्मिता व प्रियांका यांनी अस्थींचे दर्शन घेतले. त्यानंतर अनेक अस्थिकलश तयार करून रक्षाविसर्जनाला आलेल्या सर्व लोकांपर्यंत नेण्यात येऊन अस्थींचे दर्शन देण्यात आले.
त्यानंतर अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, वसंत डावखरे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, आ. पतंगराव कदम, खा. संजयकाका पाटील, आ. विलास लांडे, आ. अनिल बाबर, विलासराव शिंदे, पृथ्वीराज देशमुख, दिलीप पाटील, अविनाश पाटील, चंद्रकांत दळवी, बजरंग पाटील यांनी आर. आर. पाटील यांना आदरांजली वाहिली.
अजित पवार म्हणाले की, गोरगरिबांबद्दल पोटतिडकीने बोलणारा, दीनदलितांना बरोबर घेऊन काम करणारा सहकारी गेला. बारामती व वाळव्याप्रमाणे तासगाव-कवठेमहांकाळकडेही लक्ष देऊ आणि आबांचे स्वप्न पूर्ण करू.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आ. दीपकआबा साळुंखे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, गौतम पाटील, विजय सगरे, जीवनराव भोसले उपस्थित होते.
अस्थींचे विसर्जन २४ ला
आबांच्या इच्छेनुसार दहावा, तेराव्याचा विधी आजच करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अस्थिकलश देण्यात आले. सांगली येथे मंगळवार (दि. २४)पर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, मंगळवारी अस्थींचे विसर्जन होणार आहे.