खुमखुमी असेल तर खुशाल स्वबळावर लढा - पतंगराव कदम
By Admin | Updated: June 18, 2014 10:09 IST2014-06-18T01:14:25+5:302014-06-18T10:09:00+5:30
खुमखुमी असेल, तर खुशाल स्वबळावर लढा, असा टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला लगावला.

खुमखुमी असेल तर खुशाल स्वबळावर लढा - पतंगराव कदम
सांगली : लोकसभा निवडणुकीतील अनुभव घेऊन आता विधानसभा निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल. आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, हा निर्णय ‘हायकमांड’ घेईल. तरीसुद्धा वारंवार हा मुद्दा उपस्थित होत आहे. खुमखुमी असेल, तर खुशाल स्वबळावर लढा, असा टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला लगावला.
ते म्हणाले की, मोदी लाटेमध्ये काय घडले, ते आपल्यासमोर आहे. या गोष्टीचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकांवर होईल, असे वाटत नाही. तरीसुद्धा ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल. ‘हायकमांड’च्या निर्णयापूर्वीच स्वबळाचा मुद्दा रेटणे बरोबर नाही. एवढीच खुमखुमी असेल, तर ते आपसात लढतील. आघाडीचा निर्णय होऊनही जर स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली, तर त्यांना पुढील २५ वर्षे घरी बसावे लागेल.
केंद्र व राज्य शासनाच्या योजना आम्ही लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकलो नाही. महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांचा मोठा गवगवा झाला. त्यामुळे लहान मुले, युवक व घरांतील महिलाही ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा देत होत्या. आता राज्यातील निवडणुकांसाठी सतर्क राहायला हवे. उमेदवारीबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवर घेऊन आम्ही थेट अंतिम यादीच ‘हायकमांड’ला देणार आहोत. त्यासाठीची तयारी आता सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते, नागरिकांशी चर्चा केली जाईल. त्यातून नावांची प्राथमिक यादी व नंतर अंतिम यादी तयार केली जाईल. राज्यात नेतृत्व बदलून आता फारसे काही करण्यासारखे राहिले नाही, तरीही विधानसभा निवडणुकीपूर्वी काहीही होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)