मुंबई - देशाला हिंदुत्वाचे विचार देणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते. मात्र यांना खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. तुम्ही सहकाऱ्यांना नोकर समजायला लागलात. मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
मुंबईतील पदाधिकारी बैठकीत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, दिल्लीत राज्यप्रमुखांची बैठक घेतली तेव्हा उद्धव यांनी एका राज्य प्रमुखाला फोन केला आणि म्हणाले "मालकासोबत राहणार की नोकराबरोबर जाणार" अशी तुम्ही तुलना केली. अशाने पक्ष कधीच वाढणार नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. शिवसेना बाळासाहेबांनी जीवापाड जपली. शिवसैनिकांना जपले म्हणून आम्ही बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे विचार जपले. राज्यात सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आणले असं त्यांनी सांगितले.
तसेच आमच्या उठावानंतर झालेल्या राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत येत आहे मात्र तुमच्याकडून ते का जात आहेत याचे आत्मपरीक्षण करा. घटनाबाह्य किती बोलणार, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो पण या महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी मी जन्माला आलोय. महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मला मिळाला. एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाचा सत्कार केला. पण मला शिव्या देताना त्यांनी महादजी शिंदे यांच्या वशजांचा अपमान केला. साहित्यिकांचा अपमान आणि ज्यांच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले त्यांचाही अपमान केला. गरज सरो वैद्य मरो अशी तुमची वागणूक आहे असं सांगत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाने शरद पवारांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
दरम्यान, महायुतीत तिन्ही पक्ष काम करत आहेत. कोणतेही कोल्ड वॉर नाही तर विकास विरोधी काम करणाऱ्यांच्या विरोधात आमचे युद्ध आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवायचं असं बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केले पण सकाळ संध्याकाळ त्यांनाही तुम्ही शिव्या देताय. उठता बसता तुम्ही शिव्या देताय, तुमची शिव्यासेना झालीय का? असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेला लगावला.