सिंधुदुर्गवर अन्याय झाल्यास मंत्र्यांची गाडी अडवू : राणे
By Admin | Updated: December 11, 2014 23:42 IST2014-12-11T23:14:56+5:302014-12-11T23:42:18+5:30
जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून आमच्यावर अन्याय करणार असाल, तर यापुढे एकाही मंत्र्याची गाडी जिल्ह्यात फिरू देणार नाही.

सिंधुदुर्गवर अन्याय झाल्यास मंत्र्यांची गाडी अडवू : राणे
सावंतवाडी : गेल्या पाच वर्षात विधानसभेत तोंड न उघडणाऱ्या आमदारांनी आता राज्यमंत्री झाल्यावर जिल्ह्याचा विकास आराखडा ७५ हजार कोटींवरून एक लाख कोटीपर्यंत घेऊन जावे, आम्ही त्याचे स्वागत करू. मात्र, जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून आमच्यावर अन्याय करणार असाल, तर यापुढे एकाही मंत्र्याची गाडी जिल्ह्यात फिरू देणार नाही. गाडीच्या आडवा उभा राहणारा मी पहिला असेन, असा इशारा काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.
ते सावंतवाडी तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, सभापती प्रमोद सावंत, गुरूनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, तालुकाध्यक्ष संजू परब, बाळा गावडे, मंदार नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर आतापर्यंत कोणत्याही आमदाराने आवाज उठवला नाही. आमदार नीतेश राणे यांनी तीन दिवसात विधानसभा दणाणून सोडली. येथील आमदार मागच्या सरकारात होते. त्यावेळी त्यांनी आपली निष्ठा शरद पवारांवर वाहिली होती. पवारच आपले बाप म्हणत पण आता पवारांना सोडून मातोश्रीच्या दरवाजावर जाऊन मंत्रीपद मिळवले. मंत्रिपदाला कोणीही विचारत नाही आणि कोणी त्यांचे सल्लेही घेत नाही. फक्त नावाला राज्यमंत्री असतात, असे सांगत राणे यांनी जिल्ह्याचा आराखडा युती सरकार येताच कमी झाला असून तो आराखडा १ लाख कोटींवर नेऊन ठेवा, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, काँगे्रस संघटनेत बदल करण्याची वेळ येऊन ठेपली असून आता आपणास विरोधी पक्षात असल्याचे भान ठेऊन काम केले पाहिजे. सर्वांनी एकीने काम करा आणि पुन्हा एकदा आपल्या बद्दलचा विश्वास निर्माण करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या मेळाव्यात डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, अंकुश जाधव, बाळा गावडे, सभापती प्रमोद सावंत आदींनी विचार मांडले. या मेळाव्याचे प्रास्ताविक अन्वर खान यांनी तर नारायण राणे यांचे स्वागत संजू परब यांनी केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (प्रतिनिधी)
‘त्यासाठी’ प्रधान सचिवांना फोन केला
मी कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेत नाही. मात्र, सावंतवाडीत विद्युत तारा पडून दोन युवकांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत प्रधान सचिवांना फोन केला आणि युवकांच्या पत्नीला नोकरी देण्याची सूचना केली. त्याला सचिवांनी संमती दर्शवली असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.