‘प्राथमिक’मुळे कोलमडणार ‘माध्यमिक’चे वेळापत्रक; अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उडणार तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 06:57 AM2024-04-25T06:57:13+5:302024-04-25T06:57:39+5:30

आठवड्याच्या किमान ४५ तासिका पूर्ण करीत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळा उशिरापर्यंत सुरू ठेवावी लागेल, अशी शक्यता माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी उपस्थित केली.

If the primary school time is changed, the secondary school schedule will also have to be changed. | ‘प्राथमिक’मुळे कोलमडणार ‘माध्यमिक’चे वेळापत्रक; अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उडणार तारांबळ

‘प्राथमिक’मुळे कोलमडणार ‘माध्यमिक’चे वेळापत्रक; अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उडणार तारांबळ

प्रशांत बिडवे

पुणे : राज्यातील शाळांमधील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेनंतर भरविण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिकची वेळ बदलल्यास माध्यमिकच्या वेळापत्रकांतही बदल करावा लागेल.  पर्यायाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास शाळा उशिरापर्यंत भरवाव्या लागतील, असे विविध शाळांतील मुख्याध्यापकांना वाटते. 

मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुरेशा खोल्यांअभावी असंख्य शाळा एकाच इमारतीमध्ये दोन सत्रांत चालतात. पुणे महापालिकेच्या सुमारे ५० ते ६० टक्के शाळा एकाच इमारतीत दोन सत्रांत भरतात. सध्या प्राथमिक शाळा सकाळी ७ ते १२:३०, तर दुपारी १२:३० ते ५:३० या कालावधीत माध्यमिकचे वर्ग भरतात. त्यात ‘प्राथमिक’चा वेळ सकाळी ९ ते २ या कालावधीत भरल्यास त्यापुढे माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी २ ते ७ यादरम्यान भरवावे लागतील. आठवड्याच्या किमान ४५ तासिका पूर्ण करीत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळा उशिरापर्यंत सुरू ठेवावी लागेल, अशी शक्यता माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी उपस्थित केली.

पालकांनी करायचे काय?
राज्यातील मोठ्या शहरांत सायंकाळी उशिरा शाळा सुटल्यास विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागेल. शहरातील अनेक पालक कार्यालय सुटल्यानंतर घरी परतताना शाळेतून मुलांना घरी घेऊन येतात. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसाठीही शाळांची बदललेली वेळ गैरसोयीची ठरणार आहे.

दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांमध्ये तासिकांचे नियोजन करताना मुख्याध्यापकांची धावपळ उडणार आहे, तसेच तासिका पूर्ण करण्यासाठी माध्यमिक शाळेची वेळ रात्री ७ ते ७:३० वाजेपर्यंत ताणली जाईल. - रामदास खैरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक

शाळांजवळील परिसर, विद्यार्थी-पालकांना विचारात घेत व्यवस्थापन, संस्थाचालकांनी शाळांची वेळ निश्चित केली पाहिजे. शासनाने शाळांची वेळ बदलून समाजाचे वेळापत्रक विस्कळीत करू नये. - डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

मोठ्या शहरात दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांची संख्या जास्त आहे. शाळांवर वेळ बदलाचा निर्णय लादू नये. त्या- त्या पालक सभांना शाळेची वेळ काेणती ठेवावी, याचा निर्णय घेऊ द्यावा.- हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ

Web Title: If the primary school time is changed, the secondary school schedule will also have to be changed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा