"आज जेव्हा एखाद्या कळकळीच्या विषयवार तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं, त्यावेळेस समाजसुधारणेची स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून वेळेस अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांच कौतुक करावं तितकं कमी आहे", असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या साहित्यिक आणि कलाकारांना खडेबोल सुनावले आहेत.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी एक पोस्ट केली. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबतचा जुना फोटो पोस्ट करत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ढवळाढवळ करणाऱ्यांची दाणादाण उडवली
"आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती... आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच, पण त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दाणादाण उडवून दिली", असे राज ठाकरे म्हणाले.
"संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. ही अशी एक चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली, ती पक्षविरहित होती, विचारधारा विरहित होती, या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केलं", अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या.
आज आजोबा हयात असते, तर...
राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आजोबांचं एक पुस्तक आहे त्यांचं नाव आहे 'देवांचा धर्म की धर्माची देवळे' आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून, धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते."
"असो. पण आम्हा सर्व ठाकरे परिवाराला ओळख , ताकद, आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निव्वळ आजोबांमुळेच", अशा शब्दात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंना अभिवादन केलं आहे.