दोन कच्चीबच्ची नसती तर मीही जीव दिला असता...

By Admin | Updated: April 30, 2016 03:00 IST2016-04-30T03:00:08+5:302016-04-30T03:00:08+5:30

आघातांमुळे ताईबाई वाघे या कातकरी समाजातील महिलेवर अक्षरश: आभाळ कोसळले आहे.

If I had not had two kids, I would have also given life ... | दोन कच्चीबच्ची नसती तर मीही जीव दिला असता...

दोन कच्चीबच्ची नसती तर मीही जीव दिला असता...

आकाश गायकवाड,

कल्याण- हत्येच्या गंभीर आरोपाखाली अवघ्या १६ वर्षांचा मुलगा तुरु ंगात गेला. मुलाच्या कृत्याचा मानसिक धक्का आणि पोलिसांचा ससेमिरा असह्य झाल्याने वडील रमेश यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एका पाठोपाठ दोन आघातांमुळे ताईबाई वाघे या कातकरी समाजातील महिलेवर अक्षरश: आभाळ कोसळले आहे. माझ्या पदरात अनिल आणि अर्जुन ही लहानगी मुलं आहेत. त्यांचं पालन-पोषण आता मलाच करायच आहे म्हणून नाहीतर मलाही जगण्यात राम वाटत नाही. आत्महत्या करून जीवन संपवून टाकावसं वाटू लागलय, असं ‘लोकमत’ला सांगतांना त्यांनी डोळ््याला पदर लावला.
कल्याणच्या शहाड भागातील साईराम सोसायटीत राहणाऱ्या प्रियांका दरवडे या तरु णीची १३ एप्रिल रोजी निर्घृण हत्या झाली. मारेकऱ्यांनी घरातून सोन्याचे दागिने, मोबाइल असा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी कल्याणच्या मिलिंदनगर मागे असलेल्या कातकरी वाडीतील वाघे यांचा १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलासह अन्य चारजणांच्या टोळीला अलीकडेच अटक केली. या टोळीचा म्होरक्या वाघे यांचा मुलगा असल्याचा पोलिसांचा दावा आले. चोरीच्या उद्देशाने ही हत्या त्याने केल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
मुलाच्या अटकेनंतर पोलिसांचा ससेमिरा वाघे कुटुंबीयांच्या मागे लागला. त्यातच मुलाने खून केल्याने समाजात अप्रतिष्ठा झाल्यामुळे सर्वस्तरातून लोकांची टीका व्हायला लागली. आपला मुलगा इतका निर्घृण कृत्य कसा काय करू शकतो या कल्पनेने व्यथित झालेल्या रमेश वाघे यांनी आपली जीवनयात्रा संपवली. पत्नी ताईबाई हात फ्रॅक्चर झाल्यामुळे काही दिवसांपासून धुण्याभांड्याच्या कामाला जात नव्हत्या. दोन दिवसांपूर्वी घरामध्ये बसून कंटाळा आल्यानं पती रमेश यांच्या परवानगीने दुपारी त्या कामाला दुपारी निघून गेल्या. वाघे यांची थोरली विवाहित कन्या त्या वस्तीत शेजारीच राहते. जाताना वडलांना जेवायला वाढ, असे सांगून त्या गेल्या.
पत्नीची पाठ वळताच रमेश यांनी घरातील पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्मत्या केली. दुपारी मुलगी जेवण घेऊन आली असता घराचा दरवाजा आतमधून बंद केला होता. बराच वेळ दरवाजा वाजवून आतून कोणता प्रतिसाद न दिल्याने अखेर शेजारच्या नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला असता वडील पंख्याला गळफास घेऊन लटकताना आढळून आले. रमेश वाघे हे मोलमजुरी करीत होते तर त्यांची पत्नी ताईबाई या धुणीभांडीची कामे करून आपल्या अनिल व अर्जुन या दोन लहान मुलांचे पालन-पोषण करीत होते. अनिल हा इयत्ता पाचवीत तर अर्जुन हा इयत्ता दुसरीत महापालिका शाळेत शिक्षण घेत आहे. वाघेंच्या दोन मुली मोठ्या असून त्यांची लग्नं झाली आहेत.

Web Title: If I had not had two kids, I would have also given life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.