...तर हेपॅटायटिसला लागेल ब्रेक - बच्चन
By Admin | Updated: August 2, 2016 02:20 IST2016-08-02T02:20:49+5:302016-08-02T02:20:49+5:30
गरोदर महिलांनी बाळंतपणानंतर हेपिटायटिसचे इंजेक्शन घेण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.

...तर हेपॅटायटिसला लागेल ब्रेक - बच्चन
मुंबई : गरोदर महिलांनी बाळंतपणानंतर हेपिटायटिसचे इंजेक्शन घेण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. अंगणवाडी आरोग्य सेविकांनी या महिलांचे प्रबोधन केल्यास ते खूप उपयुक्त ठरेल, असे मत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मातांमधून बाळांना होणाऱ्या हेपिटायटिसच्या लागणीला ब्रेक लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. हेपिटायटिसचे दूत म्हणून कार्यरत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात ही भावना व्यक्त केली आहे.
भारतातून हेपिटायटिसच्या समूळ उच्चांटनासाठी आपले संपूर्ण सहकार्य असेल, आपल्या हाकेला आपण नेहमीच उपलब्ध असू, अशी ठाम ग्वाहीदेखील बच्चन यांनी या वेळी दिली. भारतातून २०२०पर्यंत हेपिटायटिस-सी आणि २०८०पर्यंत हेपिटायटीस बीचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा या वेळी करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्यमंत्री अनुप्रिया पटेल, केंद्रीय आरोग्य संचालक डॉ. जगदीश प्रसाद तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींचीही उपस्थिती होती.
या वेळी डॉ. अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, हेपिटायटिसची इंजेक्शन तयार करणाऱ्या उत्पादकांची बैठक घेतली आहे. २०१८पर्यंत लागणविरहित हेपिटायटिसची इंजेक्शन निर्मितीचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे ध्येय आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारताला दरवर्षी ४० कोटी हेपिटायटिस बी लस आणि ६ कोटी हेपिटायटिस सी लसींची गरज आहे. भारतात एचआयव्ही आणि मलेरियामुळे मृत्युदर घटला असला तरी हेपिटायटिसमुळे मृत्युदरात वाढ होत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)