सरकार नकारात्मकपणे चालविले नसते तर मोदी लाटेतही निवडून आलो असतो - जयंत पाटील
By Admin | Updated: September 21, 2016 20:06 IST2016-09-21T20:06:44+5:302016-09-21T20:06:44+5:30
राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. शेवटच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते

सरकार नकारात्मकपणे चालविले नसते तर मोदी लाटेतही निवडून आलो असतो - जयंत पाटील
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २१ : राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. शेवटच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते तर मोदी लाटेतही आम्ही निवडून आलो असतो व सत्ता मिळाली असती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामकाजावर टिका केली आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याची सुरुवात अकोला येथील कार्यक्रमातून केली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चव्हाण यांना लक्ष्य करीत बाबांच्या चुकीच्या धोरणांमुळे सत्ता गेली असे विधान केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘राष्ट्रवादीचे नेते माझ्याकडे बिल्डरांच्या फायली घेऊन यायचे. दबाव आणायचे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या खोट्या चौकशा लावल्या असा आरोपही केला जातो,’ असे म्हणाले होते.
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारभारावर टिका केली आहे. जयंत पाटील हे पाल रा.रावेर येथील मेळाव्यानिमित्त जळगाव येथे आले असता लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.
प्रस्ताव कुणाचे हे बघितले जायचे
जयंत पाटील पुढे म्हणाले, आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात दिरंगाई, टाळाटाळ असे प्रकार सुरू झाले. मंजुरीसाठी आलेला प्रस्ताव कोणत्या पक्षाचा आहे हे बघितले जायचे. निर्णय घेतले जात नव्हते, असेही पाटील म्हणाले.
खडसेंची वापसी अशक्य
राज्य सरकारमधील मंडळीने ज्या पद्धतीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना निरोप दिला ते पाहता खडसे पुन्हा मंत्रीमंडळात परततील, असे मला वाटत नाही. खडसे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्याबाबत खडसे निर्दोष बाहेर पडतात की नाही हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल, असेही पाटील म्हणाले.