काँग्रेसने सहकार्य केल्यास वेगळा विदर्भ

By Admin | Updated: October 27, 2014 00:32 IST2014-10-27T00:32:52+5:302014-10-27T00:32:52+5:30

भाजप छोट्या राज्याच्या निर्मितीचा पुरस्कर्ता असून काँग्रेसने सहकार्य केल्यास येत्या काळात स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी

If Congress cooperates, then separate Vidarbha | काँग्रेसने सहकार्य केल्यास वेगळा विदर्भ

काँग्रेसने सहकार्य केल्यास वेगळा विदर्भ

भाजप पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी : नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती
गणेश वासनिक - अमरावती
भाजप छोट्या राज्याच्या निर्मितीचा पुरस्कर्ता असून काँग्रेसने सहकार्य केल्यास येत्या काळात स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी अमरावतीत दिली.
ना. गडकरी हे येथे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी येथील शासकीय विश्राम भवनात भाजप पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा करताना स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी फार जुनी आहे. मात्र तेलंगणाच्या धर्तीवर वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन किंवा उठाव करण्यात आला नाही. त्यामुळे शासनकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी गांभीर्याने घेतली नसल्याचे गडकरी म्हणाले. तेलंगणा राज्य निर्मितीसाठी लोक रस्त्यावर उतरलेत. आमदार, खासदारांनी राजीनामा सत्र चालविले. काहींनी आत्महत्या करुन तेलंगणा राज्य निर्मितीसाठी बलिदान दिले. त्यामुळे शासनकर्त्यांना स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण करणे भाग पाडले. परंतु वेगळ्या विदर्भाची मागणी जुनी असताना जनतेतून त्याकरिता जोराचा रेटा नाही. परिणामी वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले. मात्र भाजपने निवडणुकांच्या काळात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण केले जाईल, असा अजेंडा काढला होता. या अजेंड्यावर भाजप आजही कायम असून काँगे्रसने सहकार्य केल्यास येत्या काळात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी भाजप पुढाकार घेईल, असेही गडकरी यांनी सांगितले. विदर्भात उद्योगधंदे आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून अमरावतीत नवीन उद्योगधंदे स्थापन करण्यास वाव असल्याचे त्यांनी मान्य केले.
दरम्यान, भाजपच्या नेत्या निवेदिता चौधरी यांनी नांदगाव पेठ, तिवसा येथे नवीन उद्योगधंदे आणण्याची मागणी रेटून धरली. यावेळी प्रसार माध्यमांनी हल्ली राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन सुरु झालेल्या राजकीय घडामोडींवर विचारणा केली असता गडकरींनी याविषयी भाष्य करणे टाळले. त्यांनी आपण दिल्लीत सेट असल्याचा दुजोरा दिला. मुख्यमंत्री, मंत्रिपदे कोणाला? हे ठरविण्यासाठी केंद्रातून निरीक्षक नेमण्यात आल्याचे गडकरी म्हणाले.
यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रदीप शिंगोरे, निवेदिता चौधरी, सदाभाऊ पुंशी, शेतकरी संघटनेचे जगदीश नाना बोंडे, विजय मोहता, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: If Congress cooperates, then separate Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.