BJP Narayan Rane: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजपच्या विधानपरिषद आमदार चित्रा वाघ यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडलं. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना लक्ष्य केलं जाऊ लागल्यानंतर आता भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी वाघ यांची पाठराखण केली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता, असं राणे यांनी चित्रा वाघ यांना उद्देशून म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "वा! चित्राताई वाघ वा! छत्रपती शिवरायांच्या १५ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांच्याही तुम्ही चिंधड्या उडवल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई," अशा शब्दांत राणे यांनी चित्रा वाघ यांचं कौतुक केलं आहे.
"मी अशीच लढत राहीन"
नारायण राणे यांच्याकडून कौतुक झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर त्यांचे आभार मानले आहेत. चित्रा वाघ म्हणाल्या की, "धन्यवाद राणे साहेब…मी सत्यासाठी आणि न्यायासाठी अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावते."
दिशा सालियान प्रकरणी वाघ यांची भूमिका काय?
विधानपरिषदेत दिशा सालियान मृत्यू प्रकरण उपस्थित करत चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं की, "दिशा सालियान प्रकरणावर अनेकांनी मुद्दे मांडले. तिच्या वडिलांनी रिट पिटिशन दाखल करून काही मुद्दे उपस्थित केले आहेत. मी काय म्हटले की, एसआयटी स्थापन झाली आहे, त्याचा रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. जे खरे आहे, ते जनतेसमोर आले पाहिजे. 'दूध का दूध, पानी का पानी' व्हायला पाहिजे. यावर संजय राठोड यांचा विषय घेण्यात आला. संजय राठोड यांच्या विषयावर चित्रा वाघ यांनी काय केले होते, असे मुद्दे मांडण्यात आले. मी केले मला जे करायचे होते ते. जे मला दिसले, जे पुरावे आले, त्या आधारावर लढले. तुम्ही तोंड शिवून बसला होतात का, तुम्ही शेपूट घातले," असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.