नेताओंके बदले अंदाज..

By Admin | Updated: October 7, 2014 16:45 IST2014-10-07T16:45:42+5:302014-10-07T16:45:52+5:30

धोतर-सदरा, पायजामा-कुर्ता अन् टोपी ही नेत्यांची वर्षानुवर्षांची ओळख आता मागे पडली असून त्यांच्या पेहरावामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. नेत्यांचे ड्रेस हा बिगबजेट विषय बनला आहे.

Ideas instead of leaders .. | नेताओंके बदले अंदाज..

नेताओंके बदले अंदाज..

महागड्या कपड्यांचा पुढार्‍यांचा फॅशन शो

 
यदु जोशी■ मुंबई
 
धोतर-सदरा, पायजामा-कुर्ता अन् टोपी ही नेत्यांची वर्षानुवर्षांची ओळख आता मागे पडली असून त्यांच्या पेहरावामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. नेत्यांचे ड्रेस हा बिगबजेट विषय बनला आहे. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. फक्त नट-नट्या, मॉडेलच नाही तर नेतेही फॅशन डिझायनरच्या मदतीने हँडसम दिसण्यासाठी धडपडत आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात घातलेले वेगवेगळ्या रंगांचे जॅकेट हा चर्चेचा विषय होता. आज भाजपामधील देवेंद्र फडणवीसांपासून आशिष शेलारांपर्यंतच्या नेत्यांवर या मोदी जॅकेटचा प्रभाव दिसतो. अनेक दुकानांमध्ये 'मोदी जॅकेट' मिळेल, असे बोर्ड लागलेले दिसतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पँट, हाफ शर्ट आणि त्यावर जॅकेट अशा पेहरावाला हल्ली पसंती दिली आहे. 
मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांनी २0 वर्षांपूर्वी कुर्ता, पायजामा अन् जॅकेट अशा वेषाने लक्ष वेधून घेतले होते. नेत्यांच्या पेहरावातील साधेपणा लोप पावून त्यात फॅशन येण्याची ती जणू सुरुवात होती. पुढे काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांनी सफारीचा ट्रेंड आणला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुर्ता, पायजामा अन् ज्ॉकेटला पसंती देतात. हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, नितीन राऊत हे माजी मंत्री आकर्षक, रंगीबेरंगी अन् महाग कपडे घालण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 
नेता आणि खादी असे आधीचे समीकरण होते. नेत्यांच्या अंगावरून खादी जाईल, अशी कल्पना काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणी केली नसती. पण आता खादीला पर्याय म्हणून लिननच्या कापडाला पसंती दिली जात आहे. एरवी लिनन ५00 रुपये मीटरपासून मिळते पण बहुतेक नेते वापरतात ते लिननचे कापड ४ हजार रुपये ते २५ हजार रुपये मीटर किमतीचे असते. सध्या अशा महागड्या लिननला नेते पसंती देत आहेत. काही जण खादी अन् लिननचा मेळ साधून कपडे शिवून घेतात. या कपड्यांची शिलाई हजारो रुपयांच्या घरात असते. माधव टेलर म्हणजे माधव अगस्ती हे नेत्यांचे कपडे शिवण्यासाठी प्रसिद्ध असे नाव. नेत्यांच्या कपड्यांमध्ये अलिकडे मोठय़ा प्रमाणात बदल होत असले तरी दर दहा वर्षांनी या कपड्यांची फॅशन कुठल्या ना कुठल्या प्रकारे बदलते, असे त्यांचे निरीक्षण. बहुतेक नेते डिझायनरच्या सल्ल्याने कपडे शिवतात. आधीच्या तुलनेत आजचे नेते कपड्यांबाबत अधिक कॉन्शस असतात. नेत्यांच्या या नव्या लूकला राजकारणाचा 'कॉर्पोरेट लूक' म्हणता येईल. कुठून येते लिनन
नागपुरातील लिनन कापडाचे व्यावसायिक संदीप देशमुख यांनी सांगितले की, लिननचे कापड एका झाडापासून तयार केले जाते. फ्रान्स आणि बेल्जियममध्ये केवळ ६४ हजार हेक्टर जमिनीवर त्याची शेती होते. भारतात त्याच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारा बिर्लांचा एकमेव उद्योग कोलकाताजवळ रिशडा येथे आहे. स्वस्त लिनन कापड लवकर चुरगळत नाही. महागडे लवकर चुरगळते आणि ते तुम्ही दिवसभर घालू शकत नाही.
 

Web Title: Ideas instead of leaders ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.