परीक्षा प्राधिकरण स्थापण्याचा विचार

By Admin | Updated: December 4, 2014 23:46 IST2014-12-04T22:09:57+5:302014-12-04T23:46:51+5:30

विनोद तावडे : कुलगुरूंनी गुणवत्तेवर भर द्यावा

The idea of ​​setting up the Examination Authority | परीक्षा प्राधिकरण स्थापण्याचा विचार

परीक्षा प्राधिकरण स्थापण्याचा विचार

कोल्हापूर : राज्यातील विद्यापीठांवर परीक्षांचा ताण अधिक असून, तो कमी करण्याबाबत परीक्षांचे प्राधिकरण स्थापन करण्याचा विचार आहे. त्याबाबत प्राथमिक स्वरूपात राज्यपालांसमवेत चर्चा झाली आहे. हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये याबाबत कुलगुरू, प्र-कुलगुरूंची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविणार आहोत. कुलगुरूंचा योग्य मान राखला जाईल. त्यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीवर भर द्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज, गुरुवारी येथे केले.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री तावडे यांनी शिवाजी विद्यापीठातील अधिकारी, व्यवस्थापन व विद्या परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, विभागीय शिक्षण सहसंचालक आर. एन. कांबळे, आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते.
मंत्री तावडे म्हणाले, विद्यापीठासाठी कुलगुरूंनी राजकारण्यांच्या दारात, मंत्रालयात हेलपाटे मारू नयेत. तसे होणे शैक्षणिक गुणवत्तावाढीला मारक ठरणारे आहे. कुलगुरूंचा योग्य मान राखला जाईल. त्यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीवर भर द्यावा. ज्याप्रमाणे काही लोकांना पंढरीच्या वारीला जाता येत नाही; पण ते वारी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर रस्त्यांची स्वच्छता, अडथळे दूर करतात. शैक्षणिक विकासातील अडथळे दूर करण्याची सरकारची भूमिका आहे. मंत्रालयातील अधिकारी प्राध्यापकांच्या वेतनावर खर्च होणारे २९ हजार कोटी रुपये खर्च म्हणून दाखवितात. मात्र, तो खर्च नसून प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठीची केलेली गुंतवणूक आहे.
विद्यापीठांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून ती समाजाच्या समोर आली पाहिजे. त्यासाठी प्राध्यापकांनी संशोधनाचा दर्जा वाढवावा. (प्रतिनिधी)

‘कार्बन क्रेडिट’ राबवा
शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, पर्यावरणविषयक नवीन प्रयोग चांगले आहेत. यापुढचे पाऊल म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ‘कार्बन क्रेडिट’ ची संकल्पना राबवावी, अशी सूचना मंत्री तावडे यांनी केली.
ते म्हणाले, यातंर्गत काही गुण देण्याचे नियोजन करावे. त्यातून पर्यावरण रक्षण विद्यार्थ्यांपर्यंत लवकर पोहोचेल.

Web Title: The idea of ​​setting up the Examination Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.