इचलकरंजी ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स--राज्यातील पहिलेच शहर
By Admin | Updated: December 19, 2014 00:31 IST2014-12-18T22:07:16+5:302014-12-19T00:31:24+5:30
’कविता गुप्ता यांची घोषणा : निर्यात वृद्धीसाठी केंद्र सरकारकडून निवड,

इचलकरंजी ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स--राज्यातील पहिलेच शहर
इचलकरंजी : केंद्र सरकारने इचलकरंजी शहराची ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स’ म्हणून निवड केली असून, या परिसरातील उद्योजकांनी त्यांची उत्पादने निर्यात करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करील, अशी घोषणा केंद्र सरकारच्या अतिरिक्त महासंचालिका कविता गुप्ता यांनी केली. टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स म्हणून निवड झालेले इचलकरंजी हे महाराष्ट्रातील पहिलेच शहर आहे.
केंद्र सरकारच्या व्यापार व उद्योग मंत्रालयाच्यावतीने निर्यात बंधू योजनेअंतर्गत झालेल्या उद्योजक-व्यापाऱ्यांच्या बैठकीत कविता गुप्ता बोलत होत्या. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहातील आपल्या प्रमुख भाषणात महासंचालिका गुप्ता म्हणाल्या, निर्यात वृद्धीसाठी आज ही बैठक आयोजित केली आहे. आपली दर्जेदार उत्पादने निर्यात करण्यासाठी उद्योजकांनी एक पाऊल पुढे टाकले तर सरकार दोन पावले पुढे येईल. सूत व कापड उद्योजकांच्या सोयीसाठी सामूहिक सेवा केंद्र उघडल्यास सरकार एक खिडकी योजनेप्रमाणे उद्योजक-व्यापाऱ्यांना सहकार्य करेल.
सुरूवातीला इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी स्वागत केले व प्रास्ताविकात येथील वस्त्रोद्योगाच्या प्रगतीचा आढावा घेतला. नजीकच्या वर्षात इचलकरंजीतून प्रती महिना २५ लाख मीटर कापड निर्यात करण्याची ग्वाही कोष्टी यांनी दिली. विदेश व्यापार संचनालयाचे उप महासंचालक आर. सी. कालरा म्हणाले, कपड्याबरोबर चांदीचे दागिने, फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योगाची उत्पादने सुद्धा येथून निर्यात करण्यासाठी उद्योजक-व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा.
माजी मंत्री प्रकाश आवाडे, डी. जी. लोकेश, नीतेश सुरी, रवी कुमार, रत्नाकर बॅँकेचे अमित राज, भारतीय निर्यात ऋण गॅरंटी निगमचे वि. भा. सावर्डेकर, पिडीएक्सएलचे संचालक सुनील पाटील, आदी उपस्थित होते.
तीन वर्षांच्या सर्वेक्षणानंतर निवड
टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्ससाठी इचलकरंजीची निवड करताना गेल्या तीन वर्षांचा मागोवा घेण्यात आला. तेथील विविध प्रकारच्या कपड्यांची वार्षिक निर्यात ७५० कोटी रुपयांहून अधिक असल्यामुळेच इचलकरंजीची निवड झाल्याचे महासंचालिका कविता गुप्ता यांनी स्पष्ट केले.