इचलकरंजीत साडेचार कोटींचा दरोडा
By Admin | Updated: March 29, 2015 01:09 IST2015-03-29T01:09:58+5:302015-03-29T01:09:58+5:30
कागवाडे मळ्यातील के. व्ही. पालनकर सराफाच्या पेढीवर शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात दरोडेखोरांनी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटला.

इचलकरंजीत साडेचार कोटींचा दरोडा
इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील कागवाडे मळ्यातील के. व्ही. पालनकर सराफाच्या पेढीवर शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात दरोडेखोरांनी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटला.
दरोडेखोरांनी चौदा किलो सोने, २८५ किलो चांदी व दोन लाखांच्या रोकडसह सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चौघे दरोडेखोर येथे आले. त्यांनी बंदूक आणि अन्य शस्त्रांचा धाक दाखवून रखवालदाराचे हात-पाय बांधले. चौघांपैकी एकजण तेथेच थांबला. अन्य तिघांनी पालनकर यांच्या दुकानाच्या मुख्य दरवाजालगत असलेल्या छोट्या दरवाजाचे कुलूप तोडले. आत प्रवेश करून सोन्याचे हार, बांगड्या, हिरेजडीत अन्य दागिने, अंगठ्या, गंठण आदी दागिने चोरले. दरोड्यादरम्यान रखवालदाराला बांधलेले पाहून समोरचा रखवालदारही तेथे आला. त्यालाही शस्त्राचा धाक दाखवून तेथे बसवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर दरोडेखोर पळाले. रखवालदाराने मालक पालनकर यांना चोरी झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)