मुंबई : पर्यावरणमंत्रीपंकजा मुंडे यांनी गुरुवारी विधानसभेतील अर्धा तास चर्चेसाठी पूर्वतयारी म्हणून बोलावूनही न गेलेले राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह (आयएएस) यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई येथील सहसंचालक सतीश पडवळ यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
त्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आक्रमकपणे केल्यानंतर तालिका अध्यक्ष यांनी निलंबनाचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्यानंतर कारवाई करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट प्रकल्पामुळे झालेले प्रदूषण आणि त्यामुळे शेती आणि नागरिकांचे होत असलेले नुकसान याबाबत भाजपचे आ. देवराव भोंगळे यांनी गुरुवारी रात्री विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती.
मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरत असूनही कंपनीचे दुर्लक्ष आहे, प्रदूषण मंडळाचे अधिकारी चुकीचे अहवाल देत आहेत. झालेल्या नुकसानीसाठी भरपाई दिली पाहिजे, असे भोंगळे म्हणाले.
यावर उत्तर देताना 'आपल्याकडे अधिकाऱ्यांनी जेवढी माहिती दिली आहे त्यावर आधारित उत्तर आपण दिले आहे, ब्रीफिंगसाठी बोलावूनही अधिकारी आले नाहीत, अशी उद्विग्नता मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त करताच ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार, उद्धवसेनेचे सुनील प्रभू यांनी अशा मुजोर अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी कारवाई करा की पुन्हा हिंमतच होता कामा नये. गेंड्याच्या कातडीचे अधिकारी निलंबितच झाले पाहिजेत असा आग्रह धरला.
पंकजा मुंडे यांनी सभागृहाला आश्वासन दिले की आपण विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर आठ दिवसांत गडचांदूरला जाऊ आणि पाहणी करू. सीबीआय चौकशीपासून संबंधितांवर कारवाईचा निर्णय त्यानंतर घेतला जाईल. नुकसानभरपाईबाबत कंपनीला सांगितले जाईल. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी दिले.
पंकजा मुंडेंची हतबलता
मंत्री म्हणून आपल्याला उत्तरे द्यावी लागतात, पण राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाबाबत आपल्याला काहीही अधिकार नाहीत. मी फक्त उत्तरे देण्यासाठी आहे असे मला वाटते. पण आता मला गंभीर दखल घ्यावीच लागेल आणि अधिकारांबाबत स्पष्टताही आणावी लागेल, असे मुंडे म्हणाल्या. आपण अधिकाऱ्यांना ब्रीफिंगसाठी बोलाविले होते, पण मंडळाची बैठक असल्याचे कारण देऊन ते आले नाहीत, असे पंकजा यांनी सभागृहात सांगितले.
...आणि फाइल फिरली
विधानसभेत झालेल्या मागणीच्या आधारे मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंह यांना निलंबित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आणि शुक्रवारी दुपारी तसा आदेशही निघाला. २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले देवेंद्र सिंह हे यापूर्वी रत्नागिरी आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत.
हक्कभंग प्रस्ताव आणला
सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत एम. देवेंद्र सिंह यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावरील निर्णय राखून ठेवत सरकारने याबाबत केलेली कारवाई व स्पष्टीकरण सभागृहात मांडण्याचे निर्देश दिले. आपण पुढील शुक्रवारी निर्णय देऊ, असेही ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांना ब्रीफिंग देण्यास अधिकाऱ्यांनी न येणे हा बर्फाच्या चाकूने केलेला लोकशाहीचा खून आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
Web Summary : IAS officer M. Devendra Singh suspended for skipping Minister Munde's briefing on pollution. Assembly members demanded action due to negligence regarding the Chandrapur pollution issue. CM Fadnavis ordered the suspension after assembly directives.
Web Summary : मंत्री मुंडे की प्रदूषण पर ब्रीफिंग छोड़ने पर आईएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंह निलंबित। चंद्रपुर प्रदूषण मामले में लापरवाही के कारण विधानसभा सदस्यों ने कार्रवाई की मांग की। विधानसभा निर्देशों के बाद मुख्यमंत्री फडणवीस ने निलंबन का आदेश दिया।