साई संस्थानवर आयएएस अधिकारी!
By Admin | Updated: February 18, 2017 04:45 IST2017-02-18T04:45:53+5:302017-02-18T04:45:53+5:30
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) आय.ए.एस. अधिकाऱ्यांची १५ मार्च पूर्वी नेमणूक करावी

साई संस्थानवर आयएएस अधिकारी!
औरंगाबाद/ शिर्डी : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) आय.ए.एस. अधिकाऱ्यांची १५ मार्च पूर्वी नेमणूक करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिला आहे.
साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी जगभरातून दरवर्षी लाखो भाविक येत असतात. भक्तांच्या सोईसाठी संस्थानने देणगीदारांच्या पैशातून भक्तनिवास, प्रसादालय, रूग्णालय उभारले आहेत. मात्र, पाच हजार कर्मचारी, सतराशे कोटींच्या ठेवी असताना येथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता यावी, यासाठी राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर व संदीप कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात २०१३ मध्ये याचिका दाखल केली होती़ न्यायमूर्ती के. यु. चांदीवाल व व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने २ मे २०१४ रोजी या याचिकेवर राज्य सरकारला पंचेचाळीस दिवसात संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आय. ए. एस. अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते़
यावर महाराष्ट्र शासनाने खंडपीठाच्या निकाला विरूद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती जे.एस़ केहर, न्या. एऩ व्ही़ रामन्ना, न्या. डी़ वाय़ चंद्रचुड व न्या. संजय कौल यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. तेव्हा येत्या १५ मार्च २०१७ पूर्वी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आय. ए. एस. नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले़ याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड़ प्रज्ञा तळेकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असून सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली शासननियुक्त संचालक मंडळ कार्यरत आहे.