Pankaja Munde Suresh Dhas News: बीडमधील धस विरुद्ध मुंडे राजकीय संघर्ष आणखी वाढताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार सुरेश धस आणि भाजपच्याच नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांच्यात वाद वाढला आहे. पंकजा मुंडेंनी थेट पक्षश्रेष्ठींकडे सुरेश धसांची तक्रार केली आहे. त्यावर सुरेश धसांनीही आपणही आता पंकजा मुंडेंची लेखी तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"त्या प्रकरणाशी संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं, टिप्पणी करणे अपेक्षित नाही. त्यांना समज द्यावी अशी मी पक्षश्रेष्ठी म्हणजे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विनंती केली आहे', असे पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या.
मुंडेंच्या गुपचूप भेटीवरून धसांना सवाल
त्याचबरोबर सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय तेवत का ठेवला आहे. कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? असे सवाल करत पंकजा मुंडेंनी धसांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.
पंकजा मु्ंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सुरेश धसांनी उत्तर दिले आहे. "कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो. कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते. आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात. त्याच्यामुळे कुठे जाताना कॅमेरे घेऊन जावं, हे ठरवणार नाही. दवाखान्यात असल्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो होतो, हे खरं आहे", असे उत्तर धसांनी पंकजा मुंडेंना दिले.
संतोष देशमुखांच्या हत्येचा विषय
पंकजा मुंडेंनी देशमुख हत्या प्रकरणाबद्दलही प्रश्न केला होता. त्यावर आमदार धस म्हणाले, "हे प्रकरण तेवत का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसताना, असंही त्या म्हणाल्या. तर संतोष देशमुख हा भाजपचा बूथप्रमुख आहे. बूथप्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवत ठेवलं आहे. जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही, तोपर्यंत हे प्रकरण मी तेवत ठेवणार आहे", असे सुरेश धस म्हणाले.
मी लेखी तक्रार करणार -धस
आमदार धस म्हणाले, "मी राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे लेखी तक्रार करणार. मला समज देण्याचं काय कारण? मी भाजपचा उमेदवार सोडून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भाजपचा उमेदवार सोडून दुसऱ्यांचा प्रचार केला आहे. त्यांनी शिट्टी या चिन्हाचा प्रचार केला आहे. कारवाई करायची, तर त्यांच्यावर कारवाई करा, असे माझे मत आहे", अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली.