माझी तयारी होती, टाळी उद्धवने टाळली!
By Admin | Updated: October 10, 2014 05:56 IST2014-10-10T05:56:45+5:302014-10-10T05:56:45+5:30
भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडल्यानंतर एकत्र येण्याकरिता आपण हात पुढे केला होता. मात्र उद्धवनेच टाळाटाळ केली

माझी तयारी होती, टाळी उद्धवने टाळली!
मुंबई : भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडल्यानंतर एकत्र येण्याकरिता आपण हात पुढे केला होता. मात्र उद्धवनेच टाळाटाळ केली. त्यामुळे नाइलाजाने मनसेने आपले उमेदवार उभे केले, अशी कबुली मनसे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी एका वृत्त
वाहिनीशी बोलताना दिली. मात्र त्याच वेळी निवडणुकीनंतर शिवसेना-मनसे एकत्र येण्याचे संकेतही त्यांनी दिले.
राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे हे पक्ष एकत्र येण्याबाबत पडद्याआड झालेल्या ‘त्या’ हालचालींची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, शिवसेनेबरोबरची युती भाजपाने तोडली त्या दिवशीच बाजीराव दांगट हे आपल्याकडे आले व त्यांनी शिवसेना-मनसे यांनी एकत्र येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर उद्धव यांचा फोन नंबर आपल्याकडे नसल्याने दांगट यांनी ‘मातोश्री’वर जाऊन फोन लावून आमचे बोलणे करून दिले. त्या वेळी भाजपाने युती तोडल्याबद्दल उद्धव यांनी नाराजी प्रकट केली. त्या वेळी आपणच आता काय करायचे, असे उद्धव यांना विचारले व युतीकरिता प्रस्ताव दिला, असे राज यांनी सांगितले. त्या वेळी आमच्यासमोर तीन पर्याय होते. एक निवडणूकपूर्व जागावाटपात समझोता करायचा, निवडणूक प्रचारात परस्परांवर टीका टाळायची आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचे. जागावाटपातील समझोत्याकरिता मनसेतर्फे बाळा नांदगावकर तर शिवसेनेकडून अनिल देसाई यांच्यात चर्चा व्हावी याकरिता २६ सप्टेंबर
रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत
प्रयत्न केले गेले.
मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस मनसेच्या उमेदवारांना बी फॉर्म दिले.
निवडणुकीनंतर तुम्ही दोघे एकत्र येणार का व तुम्ही दोघे एकत्र येण्यात कुणाचा अहंकार आडवा येत आहे, असा सवाल राज यांना केला असता महाराष्ट्राचे हित हे कुणाच्याही अहंकारापेक्षा मोठे आहे. मात्र सध्या आपण केवळ पक्षाच्या विजयाचा विचार करीत आहोत. निवडणुकीनंतर याबाबतचा विचार केला जाऊ शकतो, असे स्पष्ट संकेत राज यांनी दिले. (प्रतिनिधी)