महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना, दुसरीकडे कृषिमंत्री गंभीर नसल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. या व्हिडिओनंतर, आता कृषीमंत्री कोकाटेंवर चौफेर टीका होताना दिसत आहे. यासंपूर्ण प्रकरणावर आता खुद्द माणिकराव कोकोटे यांनीच स्पष्टिकरण दिले आहे. महत्वाचे म्हणजे, स्पष्टीकरण देताना कोकाटे स्वतःच स्पष्टीकरणाच्या दोन थेअरी मांडताना दिसून आले आहेत...
पहिली थेअर - कोकाटे म्हणाले, "वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वर बसलो होतो आणि हाऊस अडजर्न झालं असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता. मोबाईल ओपन केल्यानंतर युट्यूबवर येत असतान, अशा प्रकारच्या अनेक जाहीराती या ठिकाणी येतात. आता त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या मी स्किप करत होतो. ती जाहीरात स्कीप करण्यासाठी मला दोन-तीन सेकंद लागले. त्यांनी १८ च सेकंदांचा दाखवला आहे. त्यांनी आणखी पुढे दाखवला असता, तर, स्किप केलेलं त्यांनी दाखवलं असतं ना, पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही."
बरं, ते वैयक्तिक रित्या माझ्यासंदर्भात बोलताना, कधी माझ्या कपड्यांवर बोलतायत, कधी माझ्या मोबाईलवर बोलतायत, कधी माझ्या गाडीवर बोलतायत. पण माझ्या धोरणांवर, माझ्या कामांवर, मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या ज्या काही उपाययोजना आहेत, त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते काहीही बोलत नाहीत. त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही, बसू नये, अशा प्रकारचे नियम मला माहित आहेत आणि तिथे कॅमेरे चालू असतात. मी कशाला बसेल असं गेम खेळत? तेव्हा गेम खेळण्याचा काही इशूच येत नाही. ते स्किप करायचा मी दोन वेळा प्रयत्न केला. पण, स्काइप कसे करायचे हे माझ्या पटकन लक्षात आले नाही. मात्र यानंतर तो व्हिडिओ दुसऱ्याच सेकंदाला स्किप झालाय. पण तो स्किप झालेला व्हिडिओ तुम्ही दाखवलाच नाही. तुम्ही तो व्हिडिओ एकदा पूर्ण बघा. तुम्हाला लगेच लक्षात येईल. दुसरी थेअरी - व्हिडिओ काढण्याबद्दल दुमत नाही, परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे? हे YouTube वर पाहण्यासाठी मी मोबाईल हातात घेतला, मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्किप करत होतो. स्किप करताना तिथे कुणीतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित, काही सांगता येत नाही.
यावेळी तुम्हाला असं म्हणायचंय का की तेवढाच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जातंय? असे विचारले असता, कोकाटे म्हणाले १००%. मला सांगा, आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहेत हो? शेतकऱ्यांच्या संदर्भात एक तरी प्रश्न आहे का? शेतकऱ्यांची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का? अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरण तयार करतो, नव्या प्रकारचे आदेश देतो. इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत नाही आणि हे रिकामी उद्योग का दिसतात? यात काय अर्थ आहे? हे उगीचच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्याने काही होत नाही. अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पडणार नाही. याची मला कल्पना आहे.
पुन्हा दुसरी थेअरी -पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, कृषी विभागाला निधी भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत. तेव्हा 'मी रमी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट. मी सांगितली की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललं आहे? ते पाहण्यासाठी YouTube ऑन करायचे म्हणून फोन ऑन केला होता. परंतु त्याच्यावरती कुणीतरी गेम डाउनलोड केला होत. तो गेम मी स्किप करत होतो. स्किप करत असताना तेवढ्या वेळा तो व्हिडिओ आला असेल.
पुन्हा पहिली जाहिरातीची थेअर - कोकाटे पत्रकारांसोबत बोलताना पुढे म्हणाले, "तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात, येत नाहीत का? तुमचा मोबाईल ऑन करा आणि YouTube ला जा बरं तुम्ही. तुम्हाला जंगली रमीच्या जाहिराती येत नाही का? जंगली रमी जाहिराती येतात, गाण्याच्या जाहिराती येतात. कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती येणं अपरिहार्य आहे. ते काय रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना. कुठल्या गोष्टीचं भांडवल करावं, कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे. उगीच स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाहीये."