Dhananjay Munde Latest News: "इतके दिवस तुम्ही बोलवत नव्हता म्हणून मला येता येत नव्हतं. आता तुम्ही बोलावलं, तर मी आलो. जीवनातील प्रवास आठवला तर आता सुद्धा अंगावर शहारा येतो. आज जे काही माझ्यासोबत झालं आहे, ते मी राजकीय जीवनात स्वीकारेन. पण, माझ्यासह माझी जात, आई-वडील, मुले आणि जिल्ह्याची बदनामी केली गेली", असे सांगत मी दोन वेळा मरता मरता वाचलो, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वंजारी समाजाचा राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल मौन सोडले.
"जे व्हायला नको होतं, ते झालं; पण..."
धनंजय मुंडे म्हणाले, "मुंडे साहेबाच्या संघर्षाच्या काळात सावलीसारखा त्यांच्यासोबत होतो. त्यांचा संघर्ष मी बघितला. त्या संघर्षातून ते जिथपर्यंत पोहचले, तेही पाहिले. जे व्हायला नको होतं, ते झालं; पण कधी कधी वाटतं की, साहेबांची एवढी दूरदृष्टी होती. मला बाजूला केलं नसतं, तर एका मंत्रिमंडळात बहीण-भाऊ मंत्री झाले नसते", अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "माझ्यासोबत आज जे काही झाले. मी राजकीय जीवनात आहे, ते सर्व स्वीकारेन. टीकाही स्वीकारेन. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा. जर धनंजय मुंडे चुकला असेल, तर त्याला कधीच माफ करू नका. टीका धनंजय मुंडेपर्यंत असावी, धनंजय मु्ंडेच्या जातीपर्यंत नसावी."
मुंडे म्हणाले, '...ते मी सहन केले'
"धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत, आई-बाप, मुलाबाळांपर्यंत टीका, हे कधीच झाले नाही. माझी जात, इतर जाती आणि माझा जिल्हा एवढा बदनामा करावा? एक दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नाही. ते मी सहन केले", असे धनंजय मुंडे म्हणाले.
"त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता मरता राहिलोय. तुमच्या कृपेमुळे. ही गोष्ट फक्त लहाने साहेबांना माहिती आहे. ज्या समाजात जन्मलो, त्याचा अभिमान आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरं काय हवं आहे? मंत्रिपदाला काय चाटायचं आहे का?", असेही मुंडे म्हणाले.
"...तर आजारी पडलो नसतो"
"माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले गेले. न्यायव्यवस्थेने न्याय दिला. ज्यांनी कटकारस्थान केलं, त्यांना लाख रुपयांचा दंड झाला. पुढेही संघर्षातून, संकटातून जावं लागेल. संघर्षात काय करायचं, तर संयम ठेवायचा. गप्प राहिलो नसतो, तर मला आजारपण आलं नसतं. कारण माझा स्वभाव व्यक्त होण्याचा आहे", असे उत्तर धनंजय मुंडेंनी कृषी खात्यात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवर दिले.