आजकाल क्रिकेट स्पर्धांना एक वेगळेच वलय आले आहे. काही वर्षांपूर्वी काही हजारांत मिळणारी बक्षीसे आता लाखोंमध्ये गेली आहे. अनेकांना काही वर्षांपूर्वी स्पॉन्सर शोधावे लागायचे. आता स्पॉन्सरच स्पर्धा भरविणाऱ्यांना शोधत शोधत येत आहेत, अशी परिस्थिती आली आहे. मनसेने आयोजित केलेल्या एका टेनिस क्रिकेट स्पर्धेत राज ठाकरेंनी खेळाडूंशी संवाद साधला, तेव्हा एका खेळाडूला मिळालेली पारितोषिके ऐकून राज ठाकरे देखील अवाक् झाले.
मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील आयोजित स्वर्गीय रतन युवा पाटील क्रिकेट स्पर्धेसाठी राज ठाकरे कल्याण ग्रामीणमध्ये आले होते. यावेळी मैदानामध्ये त्यांनी एका खेळाडूशी संवाद साधला. यावेळी मॅन ऑफ द सिरीजला मिळालेली पारितोषिके ऐकून राज ठाकरे आश्चर्यचकीत झाले. ''पाच फोर व्हीलर, क्रिकेट शिकायला पाहिजे होते'', अशा शब्दांत राज यांनी आश्चर्य व्यक्त केले. यानंतर राज यांनी त्या खेळाडूला शुभेच्छा दिल्या.
सध्या टेनिस क्रिकेट स्पर्धांचा सिझन सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी डे-नाईट सामने भरविले जात आहेत. अगदी छोट्या छोट्या शहरांतही या स्पर्धा भरविल्या जात आहेत. अनेक खेळाडूंनी या स्पर्धांनाच आपला अर्थार्जनाचा मार्ग बनविला आहे. काही जण नोकरी सांभाळून क्रिकेट खेळत आहेत. काही वर्षांपूर्वी ५००१, १११११ अशी बक्षिसे या स्पर्धांना असायची. हौशेनवशे या स्पर्धा भरवायचे, त्या त्या भागातील नेत्यांकडे जायचे, उद्योजकांकडे जायचे आणि पहिले बक्षीससाठी स्पॉन्सर मिळवायचे. यासह अन्य बक्षिसांसाठी बेगमी केली जायची. या काळात ५१००० रुपये किंवा १००००१ रुपये पहिले बक्षीस म्हणजे आमदार, खासदार चषक असायचा. आता ते देखील मागे पडले आहे.
हे डे-नाईट सामने आता युट्यूबवर लाईव्ह प्रसारित केले जात आहेत. या सामन्यांचे शुटिंग करणे याला देखील काही तरुणांनी आपले करिअर बनविले आहे. आता या स्पर्धांची बक्षिसे ही काही लाखांत गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी ५-१० लाखांच्या कार बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आयफोन, सॅमसंग अल्ट्रा असे महागडे फोन, ईलेक्ट्रीक स्कूटर, बुलेट, एफझेड सारख्या मोटरसायकल आदी गोष्टी बक्षिसांमध्ये देण्यात येत आहेत. या स्पर्धांची उलाढाल आता लाखात होऊ लागली आहे. आणखी काही वर्षांनी याच बक्षिसांमध्ये टेस्ला, बीवायडीच्या ईलेक्ट्रीक कार आल्या तर नवल वाटायला नको.