इचलकरंजी वस्त्रोद्योगात मॉडेल सिटी करू
By Admin | Updated: October 13, 2014 00:42 IST2014-10-13T00:29:52+5:302014-10-13T00:42:41+5:30
पृथ्वीराज चव्हाण : सुरेश हाळवणकर यांना इचलकरंजीकरांनी नाकारावे

इचलकरंजी वस्त्रोद्योगात मॉडेल सिटी करू
इचलकरंजी : इचलकरंजी हे देशातील वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. म्हणूनच या शहराला वस्त्रोद्योगातील आदर्श शहर म्हणून विकसित करावयाचे आहे. ज्यामुळे इचलकरंजी देशाच्या वस्त्रोद्योगातील ‘मॉडेल सिटी’ ठरेल. तसेच या शहराला वाय-फाय सिटी करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित केलेल्या प्रचार सभेत चव्हाण बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. हाळवणकर हे वीज चोरी करणारे एकमेव आमदार आहेत, असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात एकीकडे शेतकरी वीज कपातीला तोंड देत असताना वीज चोरी करणारा लोकप्रतिनिधी इचलकरंजीतील असल्याची खंत वाटते. जनतेने अशा व्यक्तीला कदापिही स्वीकारू नये.
भाजपचे सर्वेसर्वा असणारे नरेंद्र मोदी व अमित शहा महाराष्ट्राला संपविण्यासाठी छुपे राजकारण करीत आहेत, असा आरोप करून ते म्हणाले, केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या चार महिन्यांत त्यांनी अनेक प्रकल्प गुजरातला हलविले. त्यांचा मुख्यमंत्री येथे येऊन मुंबईतील उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत. अशा मोदींना आणि मोदींच्या भाजपला महाराष्ट्रातील जनता कधीही स्वीकारणार नाही; पण मोदी मात्र सध्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून सभा घेत सुटले आहेत. मोदी मॅजिक टिकविण्याचा आटापिटा करीत आहेत.
माझ्या शासनामध्ये धरणात पाणी नसताना, काही तरी म्हणणारे, तसेच कालच्या तासगावच्या सभेत बेजबाबदारपणाचे गैर उद्गार काढणारे मंत्री असतानासुद्धा त्यांना बरोबर घेत अनेक चांगले निर्णय घेतले गेले. दुष्काळ असूनसुद्धा आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाही आपल्या शासनाने दुष्काळ आणि या गारपिटीचा सक्षमपणे सामना केला आणि शेतकऱ्यांना मदत दिली.
या सभेमध्ये प्रकाश आवाडे, खासदार प्रकाश हुक्केरी, माजी खासदार जयवंतराव आवळे, भरमूअण्णा पाटील, नगरसेवक शशांक बावचकर, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, राहुल खंजिरे, किरण कटके, नगरसेवक मोहन कुंभार, संतोष कांदेकर, बाळासाहेब देसाई यांची भाषणे झाली.
अहंकारापोटी २५ वर्षांच्या मित्राला काडीमोड
भाजपने आपल्या अहंकारापोटी २५ वर्षांच्या मित्राला-शिवसेनेला काडीमोड दिला. ‘अच्छे दिन आनेवाले’ म्हणणाऱ्या भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही चेहरा नाही, हे दुर्दैव आहे. निवडणुका झाल्यावर मोदी काय दिल्लीतून रिमोट कंट्रोलरने राज्य चालविणार आहेत काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.