ठाणे पासपोर्टची विक्र मी कामगिरी
By Admin | Updated: September 27, 2014 06:09 IST2014-09-27T06:09:58+5:302014-09-27T06:09:58+5:30
महिनाभरात सुमारे ३३,५६६ पासपोर्टचे वितरण करून ठाण्याच्या पासपोर्ट कार्यालयाने विक्रम केला आहे

ठाणे पासपोर्टची विक्र मी कामगिरी
ठाणे : महिनाभरात सुमारे ३३,५६६ पासपोर्टचे वितरण करून ठाण्याच्या पासपोर्ट कार्यालयाने विक्रम केला आहे. आजवर महिन्यातील पासपोर्ट वितरणाची संख्या १७ हजारांच्या पुढे कधीही गेली नव्हती. मात्र आॅगस्टमध्ये एकही सुटी न घेता रात्रंदिवस काम करून येथील कर्मचाऱ्यांनी आगळावेगळा विक्रम केला आहे.
ठाणे पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख पासपोर्ट अधिकारी टी.डी. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालयाने आॅगस्टमध्ये जादा तास काम करून कोणतीही सुटी न घेता ३३,५६६ पासपोर्टचे वितरण केले. गेले काही दिवस नवीन पासपोर्ट न मिळाल्याने पासपोर्ट प्रिटिंगची कामे रखडली होती. तो सगळा बॅकलॉग भरून काढण्यात आला आहे. त्यामुळे आता पासपोर्टचे वितरण सुरळीत झाले आहे़
ठाणे पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टसाठी दिवसाला एक हजार अर्ज भरले जातात. त्यांची छाननी होऊन, कागदपत्रे तपासून, पोलीस चौकशी पूर्ण झाल्यावर नवीन पासपोर्टची छपाई केली जाते. त्याचे वितरण स्पीड पोस्टद्वारे केले जाते. या कार्यालयांतर्गत ठाणे, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आदी जिल्हे येतात. जनतेचा त्रास कमी व्हावा, यासाठी ठाणे पोलिसांबरोबर सुरू केलेल्या उपक्र मांतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलीस व्हेरीफिकेशनची प्रक्रिया आता आॅनलाइन होणार आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाणे, मग ठाणे पोलीस आयुक्तालय, तेथून गोपनीय विभाग, पासपोर्ट कार्यालय असा अर्जाचा प्रवास थांबला आहे. पोलीस त्यांचा गोपनीय अहवाल आॅनलाइन भरून तो पासपोर्ट कार्यालयाकडे जमा करतात. यात वेळेची बचत झाली असून अर्ज नक्की कोणत्या स्तरावर आहे, याचीदेखील माहिती मिळते. (प्रतिनिधी)