‘लाज वाटते या पुरुषांची...’
By Admin | Updated: January 26, 2015 04:51 IST2015-01-26T04:51:25+5:302015-01-26T04:51:25+5:30
मुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवासातून मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास मात्र गेल्या काही वर्षात महिलांना नकोसा झाला आहे

‘लाज वाटते या पुरुषांची...’
मुंबई : मुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवासातून मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास मात्र गेल्या काही वर्षात महिलांना नकोसा झाला आहे. विनयभंग, अश्लिल हावभाव याविरोधात तक्रारी वाढत जात असून पाच वर्षात १४0 प्रकरणे रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) दाखल झाली आहेत. गेल्या वर्षात तरुणी,महिलांना छेडछाडीच्या ५५ घटना घडल्या असून त्यापैकी ४८ प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. छेडछाडीच्या या वाढत्या प्रकारामुळे ‘लाज वाटते पुरुषांची’, असे म्हणण्याची वेळ महिला प्रवाशांवर आली आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन लाखो प्रवासी प्रवास करतात. महिलांचा प्रवास सुरक्षित आणि चांगला होण्यासाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबाही आहे. मात्र लोकल प्रवास, तसेच प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहताना किंवा पादचारी पुलावरुन जाताना विनयभंगांचा सामना महिला प्रवाशांना करावा लागतो. कधीकधी विनयभंग, छेडछाड होत असताना अन्य प्रवाशांकडून ‘त्या’महिलेला कुठलीच मदत केली जात नाही. उलट बघ्याची भूमिकाच अनेक जण घेतात. २0१0 मध्ये विनयभंगाच्या १५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. २0१४ मध्ये याच तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली असून ५५ तक्रारी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. अश्लील हावभाव करण्याच्या तर ३५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत एका वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही वर्षापासून महिला तक्रार करण्याची हिमंत दाखवित असलेतरी तुलनेने त्याचे प्रमाण कमी आहे, असल्या प्रकाराला आळा घालण्यासाठी त्यांनी पुढे येण्याची गरज आहे.