नाशिक - मी रामकृष्ण हरी वाली आहे, फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते, खरे बोलते...मी त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही आणि खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मांसाहारावरून सुप्रिया सुळे यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातोय आणि आपल्या पैशाने खातोय, दुसऱ्याचं काही उधार नाही. जे आहे ते आपले आहे. आपण कुणाला मिंदे नाही. जे आहे डंके की चोट पे करते है...खातो तर खातो, नेमकं कुठे जेवायला गेले, तेवढेच व्हायरल केले. खाल्लं खाल्लं त्यात काय पाप केले का? उघड खाते फक्त माळ घालत नाही. खाण्याचा मोह होतो म्हणून घालत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही. मी ज्या दिवशी माळ घालेन तेव्हा समजायचं मटण सोडून दिले असं त्यांनी म्हटलं. सुळेंच्या या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत मी यावर काही बोलणार नाही, त्यांच्या विधानावर वारकरी उत्तर देतील असं सांगितले.
तसेच आपल्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झाला, तुम्ही तो जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करा या मागणीसाठी मी अमित शाहांना भेटले. दुसरे कुणी गेले का? गृहमंत्री म्हणून नव्हे तर सहकार मंत्री म्हणून त्यांच्याकडे गेले. एकजण त्यांना भेटायला गेले नाही. मुख्यमंत्री मला वेळच देत नाही. दहा वेळा भेटीची वेळ मागितली माणूस वेळ देत नाही, याचा अर्थ काय तर सुप्रिया सुळेंना वेळ द्यायचा नाही. तुम्ही माझी कामे करत नाही ना, मग माझी कामे दिल्लीतून होतात. सगळी कामे दिल्लीतून होतात असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
दरम्यान, देशात लोकशाही टिकली पाहिजे, त्यासाठी ३०० खासदार रस्त्यावर उतरले होते. ही लढाई वैयक्तिक नाही तर वैचारिक आहे. आमच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, देशात जे योग्य असेल ते मी बोलणार, ते तुम्हाला मान्य नसेल तर खुशाल गुन्हा दाखल करा, मला अटक करा. टीका करायची तर अभ्यास करून करा. सशक्त लोकशाहीत आम्हालाही लोकांच्या मागणी मांडण्याचा अधिकार आहे. दिल्लीत विरोधकांची कामे जास्त होतात. कामावर पत्ते खेळायचे आणि अब्रु नुकसानीचा दावा करणारे इथे आहेत. तुमच्याच माणसाने तुमचा कार्यक्रम केला असं सांगत सुप्रिया सुळेंनी माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता टोला लगावला.