जितेंद्र आव्हाड, आमदार
अनेकांकरिता इतिहास हा नावडता विषय असतो. इतिहासाचे दाखले देताना त्यांना अडचण येते. पण माझा हा प्रचंड आवडता विषय आहे. कदाचित देवाने मला काही शक्ती दिली आहे. इतिहासाचे कुठलेही पुस्तक वाचले की मला त्यातील दाखले पटापट देता येतात. मी युपीएससीची परीक्षा दिली, तेव्हा माझा मुख्य विषय इतिहासच होता. एमपीएससीलाही. पीएच.डी. केली तीही याच विषयात.
माझा चेहरा मॉडेलिंगसाठी योग्य वाटत असला तरी राजकारण सोडून मॉडेलिंग किंवा चित्रपटात काम करण्याची इच्छा कधीच मनात आली नाही. आई-वडिलांची भूमिका लक्षात घेता त्या क्षेत्रात जाऊच शकलो नसतो. अभ्यास आणि साचेबद्ध जीवन जगणे हे आई-वडिलांचे प्रमुख उद्दिष्ट होते. परंतु, मॉडेलिंग वगैरे सगळे साचेबद्ध जीवनाच्या बाहेरचे असल्यामुळे ते जमलेच नाही. राजकारणात येतानाही संघर्ष करावा लागला. माझ्या घरातले कुणीच राजकारणात नव्हते. त्यामुळे धक्के खात पुढे जावे लागले. सर्व प्रकारचा संघर्ष केला. खिशात पैसे नव्हते, फार कोणी ओळखीचे नव्हते. नातेवाईक नव्हते. मात्र, शिडी धरून धरून पुढे गेलो. राजकारणात मी आलो ते जयप्रकाश नारायण यांच्यामुळे. १९७०च्या युद्धानंतर जे काही या देशात झाले, त्यात प्रस्थापितांविरोधात आवाज उठविला गेला. त्यातूनच राजकारणाची आवड निर्माण झाली.
मुलगी घराची भाई
घरात महत्त्वाचा आणि अंतिम निर्णय हा मुलीचाच चालतो, ती घराची भाई आहे. ती म्हणेल तो कायदा आहे. त्यामुळे तिचा निर्णय मला आणि पत्नी ऋता हिला मानावा लागतो.
अनेकदा कुटुंबाला वेळ देणे शक्य होत नाही, हे मला मान्य कुटुंबासाठी फारसा वेळ मिळतो असे मला वाटत नाही. माझी शेवटची परदेशवारी २०१२ मध्ये झाली. त्यानंतर कुठेही बाहेर गेलो नाही. सगळ्या विषयांकडे बघणाऱ्या माणसाला वेळेची कमतरता भासते. त्यामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, हे मी मान्य करतो.
...म्हणून बंगल्याला ‘नाद’ हे नाव दिले
माणसाला जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा नाद लागत नाही ना, तोपर्यंत तो ती गोष्ट पूर्ण करू शकत नाही. म्हणून नाद हा अंतिम आहे. त्यामुळेच मी माझ्या ठाणे शहरातील बंगल्याला आणि येऊर येथील बंगल्याला ‘नाद’ हेच नाव दिले. या जितेंद्र आव्हाडशी नाद करायचा नाही, असा ते नाव देण्यामागचा हेतू अजिबात नाही.
कपड्यांचा ठरावीक चॉइस नाही
चांगले कपडे घालण्याची आवड पहिल्यापासूनच आहे. जे रंग, जे कपडे आपल्याला चांगले दिसतील, ते वापरतो. कपड्याबाबत ठरावीक असा चॉईस नाही. मात्र, शर्ट-पँट वापरताना अधिक कम्प्फर्टेबल असतो. निवडला हा गैरसमज आहे.
जे ताटात पडेल ते खातो
खाण्यापिण्याविषयी माझ्या फारशा आवडीनिवडी नाहीत. जे ताटात पडेल ते मी खातो. त्यातही घरचे आणि बायकोच्या हातचे जेवण मला अधिक आवडते. शाकाहारी अथवा मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे खाणे मला आवडते. पूर्वी फिटनेसकडे लक्ष द्यायला वेळ मिळत होता. मात्र, सध्या धावपळीमुळे फारसे लक्ष देता येत नाही. त्यातही जसा वेळ मिळेल तसा फिटनेसकडे लक्ष देतो.
शब्दांकन : अजित मांडके