Bharat Gogavale on Ajit Pawar: रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप थांबलेला नाही. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदावर ठाम आहे. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री पदाला हुलकावणी दिल्याची सल बोलून दाखवली. मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावंस पण कुठं जमतंय. कधी ना कधी तो योगही जुळून येईल, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या विधानावरुन आता भरत गोगावलेंनी टोला लगावला आहे. अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारले ते विचारतो असं म्हणत चिमटा काढला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा बोलून दाखवली. यापूर्वीही अनेकदा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं म्हटलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनीच मुख्यमंत्री पदाबाबत विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आस लावून बसलेल्या भरत गोगावले यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. खेळामध्ये आणि राजकारणामध्ये कधी काय घडेल ते सांगू शकत नाही. पण इच्छा प्रकट करणे ही चुकीची बाब नसावी, असं भरत गोगावले यांनी म्हटलं.
"हे राजकारण आहे. खेळामध्ये आणि राजकारणामध्ये कधी काय घडेल ते सांगू शकत नाही. सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठे असेल हे सांगू शकत नाही. अजितदादांना मी विचारतो की, त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे किंवा कुणाकडे काहीतरी पाहिले असेल. त्यामुळे मला विचारावे लागेल. कारण आधी युती भाजप आणि शिवसेनेची झाली आणि नंतर ते येऊन आम्हाला मिळाले. याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे इच्छा प्रकट करणे ही चुकीची बाब नसावी. पण याबाबत आता काही सांगू शकत नाही," असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं.