शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्यास मी जबाबदार - राजू शेट्टी
By Admin | Updated: June 5, 2017 18:21 IST2017-06-05T18:21:38+5:302017-06-05T18:21:38+5:30
राज्यातील सरकार निवडून आणण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. सरकारला पाठिंबा दिल्याचा आता पश्चाताप होत आहे.

शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्यास मी जबाबदार - राजू शेट्टी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - राज्यातील सरकार निवडून आणण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. सरकारला पाठिंबा दिल्याचा आता पश्चाताप होत आहे. तीन वर्षांत सरकारने शेतकऱ्यांच्या भावाना दुखावल्या आहेत. सरकरमध्य़े आम्ही सहभागी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्यास मीही तेवढाच जबाबदार आहे. त्यामुळे लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करू, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. तसेच सदाभाऊंबाबतचा अंतिम निर्णयही कार्यकारिणीच्या बैठकीत घतला जाईल असेही ते म्हणाले.
कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या विरोधात जाल, तर परिणाम वाईट होतील, असा इशारा यावेळी त्यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान, शेतकरी संपाचा आज पाचवा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बैठक झाली होती. या बैठकीत महायुतीतील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. राजू शेट्टीही या बैठकीला उपस्थित होते.