मी त्यांचा गाळ काढतोय - देवेंद्र फडणवीस
By Admin | Updated: May 29, 2017 20:24 IST2017-05-29T20:24:10+5:302017-05-29T20:24:10+5:30
गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षात काय केले, ते सांगायला तयार आहोत. त्यांनी एवढा गाळ केला आहे

मी त्यांचा गाळ काढतोय - देवेंद्र फडणवीस
>ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर, दि. 29 - गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षात काय केले, ते सांगायला तयार आहोत. त्यांनी एवढा गाळ केला आहे, की तो काढण्याचे काम मी करीत आहे. हाच गाळ शेतात गेला असता, तर खताची गरज न भासता शेतक-यांनी तीन-तीन पिके घेतली असती, अशी तोफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी डागली.
इस्लामपूर येथे शेतकरी मेळावा, जाहीर पक्ष प्रवेश व नागरी सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस वैभव शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या राज्यात शेतक-यांचा कैवार घेऊन अनेकजण आंदोलन करत आहेत. आमच्यावर शेतकरीविरोधी असल्याची टीका करतात. मात्र राज्यातील जनतेने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांचा सुफडासाफ करुन भाजपवर विश्वास दाखवला आहे. विधानसभेपाठोपाठ भाजप राज्यातील सर्वांत जास्त लोकप्रतिनिधी असणारा पक्ष बनला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर थेट टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांना काम नाही. सकाळी उठतात आणि गाळ काढायला जातात’, असे वक्तव्य आमदार पाटील यांनी केले होते. त्यावर प्रतिहल्ला चढवताना फडणवीस म्हणाले की, आघाडी सरकारने एवढा गाळ केला आहे, की तो काढण्याचे काम मी करीत आहे. हाच गाळ शेतात गेला असता, तर खताची गरज न भासता शेतक-यांनी तीन-तीन पिके घेतली असती.
ते म्हणाले की, भाजपच्या सकारात्मक वाटचालीत इतर पक्षातील चांगले लोक पक्षात येत आहेत. गेल्या अडीच वर्षांच्या काळात शेतकºयांच्या समस्या मिटल्या, असा आमचा दावा नाही. मात्र आम्ही प्रामाणिक आहोत. राज्यातील शेती क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. १९९५ च्या युती शासनाने पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा खोरेची कामे सुरु केली. त्यानंतरच्या १५ वर्षात ही कामे का पूर्ण झाली नाहीत, याचे उत्तर तत्कालीन राज्यकर्त्यांनी द्यावे. त्यावेळचा सगळा पैसा भ्रष्टाचारातच मुरला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून राज्याला २६ हजार कोटी मिळाले आहेत. जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांसाठी निधी देणार आहोत. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पिके घ्यावीत. त्यासाठी ५० लाखांपर्यंतच्या योजना देणार आहोत. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात उसाच्या एफआरपीची ९९ टक्के रक्कम शेतकºयांच्या हातात दिली आहे. हे राज्य साखरसम्राट किंवा कारखानदारांचे नाही हे त्यांना दाखवून दिले आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर शहराच्या विकासासाठी दिलेला शब्द खरा करुन दाखवला आहे. उसाच्या एफआरपीमध्ये त्यांनी न मागता २५० रुपयांची वाढ दिली आहे. ९.५ उता-यासाठी २५५० रुपयांची एफआरपी मिळणार आहे. ७०० कोटीचा ऊस खरेदी कर शासनाने माफ केला आहे. नाबार्डच्या योजनेतून दोन टक्के व्याजाने शेतक-यांना ठिबक सिंचनसाठी कर्ज देणार आहोत. ३ लाख हेक्टर जमीन ठिबकखाली आणण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकºयांच्या प्रगतीसाठी माझी लढाई लढणार आहे.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले की, शहर व तालुक्याच्या विकासासाठी आम्हाला राज्य शासनाने ताकद द्यावी.
वैभव शिंदे म्हणाले की, ज्या-ज्यावेळी जिल्हा परिषदेसाठी मला संधी आली, त्या-त्यावेळी राष्ट्रवादीच्या येथील नेतृत्वाने विरोध केला. त्या पक्षात राहून आमचा पराभव होणार असेल, तर पक्षात का रहायचे, हा विचार करुन भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. येथील नेतृत्वाने नेहमीच पाठीत खंजीर खुपला आहे. शिंदे घराण्याला आत एक बाहेर एक करण्याची सवय नाही.
भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. शहराध्यक्ष सयाजी पवार यांनी आभार मानले. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार अजितराव घोरपडे, निता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, मकरंद देशपांडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर, गटनेते विक्रम पाटील, शेखर इनामदार, मुन्ना कुरणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, दि. बा. पाटील, राजाराम गरुड, सागर खोत, बाबासाहेब सूर्यवंशी, मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील उपस्थित होते.
मला डिवचू नका : सदाभाऊ खोत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी रुंदावत चालल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच आत्मक्लेश यात्रेच्या सांगतेनंतर मोठा धक्का देऊ, या शेट्टी यांच्या विधानावर सदाभाऊंनी त्यांचे नाव न घेता कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, चळवळीत अनेक वादळे पाहिली. त्या वादळांशी दोन हात केले. कितीही मोठी वादळे आली तरी पुरुन उरणार आहे. मला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर अंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही.
विनाकारण खलनायक करू नका : सदाभाऊ खोत
मी शेतक-यांचा पोरगा आहे. मला पेरणी करायची माहिती आहे. जोमदार उगवून आलेल्या पिकाची राखण कशी करायची, पाखरे हाकण्यासाठो गोफण कधी मारायची, हे माहीत आहे. एकवेळ गोफण तुटेल, पण पक्षी एकही दाणा खाणार नाही. घात आल्याशिवाय पेरायचे नसते, याची कल्पना मला आहे. त्यामुळे मला विनाकारण खलनायक करू नका, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.
कटाप्पा कोण माहीत नाही!
मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विधिमंडळातील जयंत पाटील यांच्या बाहुबली आणि कटाप्पाचा संदर्भ देत सांगितले की, जिल्ह्यात कटाप्पा कोण आणि बाहुबली कोण, हे मला माहीत नाही. मात्र आज निशिकांत आणि वैभव या दोन बाहुबलींनी भाजपत प्रवेश केला आहे. वैभव यांचा प्रवेश अनेकांना हादरा देऊन गेला आहे. ज्यांना हादरे बसले, त्यांची स्पंदने आमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत.
कर्जमाफीच्या घोषणा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठाच्या उजव्या कोपºयातून शेतकºयांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी झाली. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा त्या दिशेने पळाला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्या प्रत्येक सभेत चार माणसे येतात आणि अशा घोषणा देऊन जातात. त्यांना तेवढेच काम दिले आहे.
मंत्र्यांची सेल्फी!
इस्लामपूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांचे समर्थक रणजीत मंत्री यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावली. आमदार पाटील त्यांचा ‘कायमचे मंत्री’ असा उल्लेख करतात. मात्र आज तेच मंत्री भाजपच्या व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पहिल्या रांगेत मुख्यमंत्र्यांसमवेत बसून त्यांनी मोबाईलने सेल्फी घेतला.
यांनी केला भाजपप्रवेश...
इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस वैभव शिंदे (आष्टा), इस्लामपूर बाजार समितीचे माजी सभापती स्वरूपराव पाटील (शिगाव), शिगावचे उपसरपंच संग्रामसिंह पाटील, राष्ट्रवादीचे वाळवा तालुका उपाध्यक्ष धैर्यशील मोरे (रेठरेहरणाक्ष), राहुल पाटील (वाटेगाव), दादासाहेब रसाळ (भवानीनगर), उद्योजक प्रसाद पाटील (बहे), अमित कदम (इस्लामपूर), राष्ट्रवादीच्या किसान भारती सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष परशुराम नागरगोजे (बेडग, ता. मिरज), सलगरे (ता. मिरज) सोसायटीचे अध्यक्ष नाथाजी पाटील व उपाध्यक्ष कैलास कोष्टी, गुलाब मालगावे (सलगरे) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना भाजपचे उपरणे देऊन स्वागत केले.