Devendra Fadnavis Latest News: 'मूळातच मला असं वाटतं की, विरोधी पक्षाला त्यांच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल', असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोले लगावले. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अंतिम आठवडा प्रस्तावाच्या मसुद्यावरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना घेरले. अंतिम आठवडा प्रस्तावाला न्याय मिळाला नाही, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्ष म्हणून कसं काम करायचं असतं, यांच्या प्रशिक्षणाची गरज असेल तर मी द्यायला तयार आहे, असा चिमटा फडणवीसांनी काढला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उत्तराच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "अंतिम आठवडा प्रस्तावाचा मजकूर बघितला, तर तीन पानांचा आहे. भास्करराव, इतके वर्ष तुम्ही सभागृहात आहात. मी सभागृहात आहे. अंतिम आठवडा प्रस्तावाचा इतका मोठा मजकूर कधीच बघितला नाही.
हेही वाचा >>'जयकुमार गोरेंविरोधात कट रचणारे शरद पवार गटाच्या संपर्कात'; CM फडणवीसांनी दोन मोठ्या नेत्यांचं घेतलं नाव
फडणवीस म्हणाले, प्रस्तावातील अर्धे विषय कुणी मांडलेच नाही
"त्यातील अर्ध्या विषयांवर कोणी बोललंच नाही. म्हणजे तुम्ही मजकुरात मांडलं, पण त्यातील अर्धे विषय कुणी मांडलेच नाहीत. म्हणजे हे तयार करणारे आणि मांडणारे यांच्यात काही संबंध आहे का? काही चर्चा झालीये का? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की, मी गृह विभागाच्या चर्चेला सविस्तर उत्तर दिले होते. पुन्हा गृह विभागाचे ते विषय आले आहेत. काही अडचण नाही. पण, त्यात नव्याने मांडणी पण काहीच नाही. तीच मांडणी झाली", असे फडणवीस म्हणाले.
"आमच्या सुनील प्रभुंनी जी आकडेवारी मांडली, तीच नाना पटोलेंनी मांडली. ती आकडेवारी कशी चुकीची आहे, हे मी परवाच सांगितलं. ती आकडेवारी कशी वाचायची? महाराष्ट्र नंबर दोन वर नाहीये, आठ वर आहे. पण, तरीही तेच याठिकाणी मांडण्यात आलं", असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.
"अंतिम आठवडा प्रस्ताव ही एक संधी असते"
"मूळातच मला असं वाटतं की, विरोधी पक्षाला त्यांच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल. आपल्याला अंतिम आठवडा प्रस्ताव ही एक अशी संधी असते, ज्याच्यामध्ये ज्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही, पण ते महत्त्वाचे विषय आहेत. असे विषय आपण अंतिम आठवडा प्रस्तावात आणतो. मांडण्यात येतात. चर्चा करतो. दुर्दैवाने फारसं तसं झालेलं दिसत नाही", असेही फडणवीस म्हणाले.
भुजबळ आणि मुनगंटीवारांची मदत घेईल -फडणवीस
"खरं म्हणजे मी स्व-इच्छेने तयार आहे, जर विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं, याचं प्रशिक्षण हवं असेल, तर मी त्यासंदर्भात पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे. आणि गरज पडली, तर भुजबळ आणि मुनगंटीवार यांचीही मदत मी घेईन. कारण शेवटी सक्षम विरोधी पक्ष असण, हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सक्षमता ही संख्येने ठरत नाही. भुजबळ साहेब एकटेच होते, पूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण विषय योग्य घेऊन घ्यायचे. त्यामुळे मला असं वाटतं की, भास्करराव तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर अन्याय झालेला दिसतो", असे मिश्कील भाष्य फडणवीसांनी उत्तराच्या सुरुवातीलाच केले.